शिक्षा ऐकून शिक्षक लागला रडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:16 PM2018-06-21T13:16:07+5:302018-06-21T13:16:23+5:30

विद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची सक्तमजुरी व ९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

The teacher started crying after listening | शिक्षा ऐकून शिक्षक लागला रडू

शिक्षा ऐकून शिक्षक लागला रडू

ठळक मुद्देविद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकाला सक्तमजुरी

अहमदनगर : विद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांची सक्तमजुरी व ९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.  दिगंबर दत्तात्रय ढोंबे (वय २७ रा. केडगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी दिगंबर ढोंबे हा वांबोरी (ता. राहुरी) येथील एका खासगी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीस होता. १६ डिसेंबर २०१६ रोजी त्याने विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. ही बाब मुलीच्या नातेवाइकांना समजली, तेव्हा त्यांनी ढोंबे याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याबाबत तपास करून पोलीस निरीक्षक बालाजी शेगेंपल्लू यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद व समोर आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण यासह विविध कलमांतर्गत पाच वर्षांची सक्तमजुरी व विविध शिक्षात एकूण ९ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मोहन पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी ढोंबे याला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावताच तो न्यायालयात ढसाढसा रडू लागला.

पीडित मुलीची साक्ष

हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.माने यांच्या न्यायालयात चालला. खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तपासी अधिकारी व पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यामुळे या शिक्षकाला न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

 

 

Web Title: The teacher started crying after listening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.