रूळावर स्कुटी आडवी घालत शिक्षिकेने अडविली रेल्वे
By Admin | Published: June 26, 2016 12:33 AM2016-06-26T00:33:01+5:302016-06-26T00:38:12+5:30
श्रीगोंदा : गेटमनने लवकर रेल्वे गेट का बंद केले? असा वाद घालत एका बेभान शिक्षिकेने रेल्वे रूळावर स्कुटी आडवी लावत चक्क नांदेड-पुणे ही पॅसेंजर अडविली.
श्रीगोंदा : गेटमनने लवकर रेल्वे गेट का बंद केले? असा वाद घालत एका बेभान शिक्षिकेने रेल्वे रूळावर स्कुटी आडवी लावत चक्क नांदेड-पुणे ही पॅसेंजर अडविली. ही घटना लोणीव्यंकनाथ ते पारगाव सुद्रिक रोडवर गेट क्रमांक ११ वर मंगळवारी (२१) सकाळी घडली. मात्र, याबाबत रेल्वेचे शाखा अभिंयता ज्ञानेश्वर देशमुख यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २४) रात्री उशीरा तक्रार नोंदवली आहे. घटनेनंतर संबंधीत महिला पसार झाली असून स्कुटीच्या क्रमांकावरून पोलीस तपास करत आहेत.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.२१) सकाळी दहाच्या सुमारास नांदेड-पुणे ही पॅसेंजर रेल्वे बेलवंडी स्टेशनवरून सुटल्यानंतर शिर्के नावाच्या गेटमनने लोणीव्यंकनाथ ते पारगाव सुद्रिक दरम्यान असणारे गेट (क्रमांक ११) बंद केले. यावेळी श्रीगोंद्याकडून एम. एच. १६, बी. ई. ७२६ या क्रमांकाची स्कुटीवरून एक शिक्षिका आली. त्यांनी गेटमन शिर्केला गेट लवकर बंद का केले, असे म्हणत धमकावले. तसेच पाहता-पाहता चक्क रेल्वे रुळावर स्कुटी आडवी लावली आणि स्वत:ही रुळावर उभी राहिली. त्यानंतर रेल्वे कशी पुढे जाते?असे म्हणत शिर्केला दम भरला. यावेळी अन्य प्रवाशांनी या शिक्षिकेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेभान शिक्षिकेने आपला तमाशा थांबवला नाही. अखेर शिर्के यांनी बेलवंडी स्टेशनला संदेश पाठवला. यामुळे नांदेड-पुणे पॅसेंजर दहा मिनिटे थांबवण्याची वेळ आली. मात्र रेल्वे थांबताच ती शिक्षिका दुचाकी काढून घेत तेथून पसार झाली. शिर्के यांनी पॅसेंजरला हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २४) रात्री उशीरा रेल्वेचे शाखा अभिंयता देशमुख यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
(तालुका प्रतिनिधी)