शिक्षक करणार नाक्यावर वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:52 AM2019-05-10T11:52:31+5:302019-05-10T11:53:40+5:30
अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पारगमन शुल्क वसुलीसाठी सुमारे ८ ते ९ शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत शिक्षक आणि त्यांच्या परिवारामध्ये संताप आहे.
अहमदनगर : अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने पारगमन शुल्क वसुलीसाठी सुमारे ८ ते ९ शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत शिक्षक आणि त्यांच्या परिवारामध्ये संताप आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पारगमन शुल्क वसुलीसाठी नेमलेल्या ठेकेदाराची मुदत ३० एप्रिलला संपली. त्यानंतर शुल्क वसुलीसाठी प्रशासनाने नाक्यांचा ताबा घेतला. या नाक्यांवर वसुली कोणामार्फत करायची, असा प्रश्न प्रशासनासमोर होता. त्यासाठी कॅन्टोन्मेंट प्रशासनाने कार्यालयातील काही विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. परंतु पुरेसे मनुष्यबळ नसल्याने प्रशासनाने थेट शिक्षकांच्या नियुक्त्या पारगमन शुल्क वसुलीसाठी केल्या. सध्या शैक्षणिक वर्ष संपले असल्याने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेत प्रशासनाने शिक्षकांना पारगमन वसुलीसाठी रस्त्यावर उभे केले आहे. प्रशासकीय आदेशासमोर शिक्षकांचे काही चालले नसल्याने त्यांनीही नियुक्त्या निमूटपणे स्वीकारल्या. तोंडावर रुमाल बांधून शिक्षक वसुलीचे काम करत आहेत. भर उन्हात उभे राहून वसुली करावी लागत असल्याने काही शिक्षक आजारी पडले आहेत. काही शिक्षकांना रात्रपाळीच्याही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक तणावाखाली आहेत.
दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. श्रीवास्तव यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.