दारू दुकान हटविण्यासाठी अकोलेत शिक्षकांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 08:25 PM2018-04-15T20:25:40+5:302018-04-15T20:28:28+5:30
येथील मॉडर्न हायस्कूलजवळ असलेले देशी दारू दुकान हटवावे, या मागणीसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील महात्मा फुले चौकालगत अकोले-देवठाण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
अकोले : येथील मॉडर्न हायस्कूलजवळ असलेले देशी दारू दुकान हटवावे, या मागणीसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील महात्मा फुले चौकालगत अकोले-देवठाण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
शाळेच्या भिंतीजवळ असलेले हे दारुचे दुकान हटवावे म्हणून अनेक दिवस प्रयत्न करूनही प्रशासन दाद देत नसल्याने शेवटी शिक्षकांनी रास्ता रोको आंदोलन केले. डॉ. कुलकर्णी हॉस्पिटलसमोर देवठाण रस्त्यावर ठिय्या देत मॉडर्न हायस्कूल, भास्करराव कदम ज्युनियर कॉलेज व ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांनी देखील या आंदोलनात उपस्थिती दर्शविली. हायस्कूलपासून घोषणा देत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महात्मा फुले चौकात आले. त्यांनी रस्ता अडवून आंदोलनामागील भूमिका भाषणांमधून विषद केली. या देशी दारूच्या दुकानाजवळ अनेकदा भांडणे होतात. दारू प्यालेले पुरुष व महिला रस्त्यावर दारू पिऊन पडतात. महिलांनाही दारू दिली जाते. याचा विपरीत परिणाम मुलांच्या मनावर होतो. या दुकानामुळे शाळचे पवित्र वातावरण गढूळ होऊ लागले आहे. त्यामुळे हे दुकान तेथून स्थलांतरित करावे, अशी शाळेची मागणी आहे. तसा स्कूल कमिटीने ठराव करून दिला आहे. पण तांत्रिक कारण सांगून प्रशासनाकडून दुकानास अभय दिला जात आहे. माजी प्राचार्य शांताराम गजे, स्कूल कमिटी अध्यक्ष सतीश बूब, ज्युनियर कॉलेज अध्यक्ष दिलीप शहा, प्राचार्य संतोष कचरे, शिक्षक दीपक जोंधळे, हेरंब कुलकर्णी यांची भाषणे झाली. १५ दिवसात कारवाई न केल्यास विद्यार्थी व पालक रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तहसीलदार मुकेश कांबळे, उत्पादन शुल्क अधिकारी परदेशी व पोलीस निरीक्षक शिळीमकर यांनी निवेदन स्वीकारले. प्रा. डी.के.वैद्य, ज्ञानवर्धिनीचे मुख्याध्यापक रावसाहेब नवले, उपमुख्याध्यापक विनीत भालेराव, दिलशाद सय्यद, प्रा.चंद्रकांत नवले आदिंसह तालुका दारूबंदी आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते निलेश तळेकर, संदीप दराडे, सुनील उगले, जालिंदर बोडखे आंदोलनात सहभागी झाले होते.