शिक्षक बँकेची रविवारी ऑनलाइन वार्षिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:25 AM2021-08-28T04:25:13+5:302021-08-28T04:25:13+5:30
शिक्षक बँकेने शतकोत्तर वाटचालीमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. कायम ठेवीवर गेल्या अठरा वर्षातील सर्वोच्च असे सव्वाआठ टक्के व्याज दिले ...
शिक्षक बँकेने शतकोत्तर वाटचालीमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. कायम ठेवीवर गेल्या अठरा वर्षातील सर्वोच्च असे सव्वाआठ टक्के व्याज दिले आहे. यावर्षी शेअर्सवर सात टक्के लाभांश प्रस्तावित आहे. मागील वर्षाचा लाभांश रिझर्व्ह बँकेची परवानगी मिळाल्यानंतर सभासदांना दिला जाणार आहे, असे उपाध्यक्ष बाबासाहेब खरात यांनी सांगितले.
या पंचवार्षिकमध्ये कायम ठेवीच्या रूपाने प्रत्येक सभासदाचा सर्वाधिक आर्थिक फायदा झाला आहे. बँकेच्या कारभारावर जिल्ह्यातील सभासद खूश असल्यामुळे वार्षिक सभेची आम्हाला चिंता नाही, असे माजी अध्यक्ष शरद सुद्रिक यांनी सांगितले.
गुरुमाउली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड सुरू असून, यावर्षी कोरोनामुळे मोठ्या संख्येने सभासद मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी कुटुंब आधार निधी आणि मयत सभासद कर्ज निवारण निधीमध्ये पोटनियम दुरुस्ती करून या दोन्ही योजनेचे लाभ देण्यासाठी संचालक मंडळ बांधील आहे. ३५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करताना १५ लाख रुपयांची मदत मयतांच्या वारसांना दिली जाते. ही ऐतिहासिक कामगिरी याच पंचवार्षिकमध्ये संचालक मंडळाने अंमलात आणली आहे, असे माजी अध्यक्ष साहेबराव अनाप व राजू राहाणे यांनी सांगितले.
बँकेचा कारभार सभासदाभिमुख आहेच, तो अधिकाधिक चांगला होण्यासाठी सभासदांच्या सूचनेप्रमाणे निर्णय भविष्यात घेतले जातील, असे माजी अध्यक्ष संतोष दुसुंगे यांनी सांगितले.
विद्यमान संचालक मंडळाने अनेक नवीन योजना सुरू केल्या आहे. बँकेकडून एटीएम सुविधा तसेच लॉकर सुविधादेखील उपलब्ध आहे. संचालक प्रवास भत्ता व वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च याबाबत चुकीची माहिती देऊन सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत, असा आरोप माजी उपाध्यक्ष विद्युलता आढाव, अर्जुन शिरसाट, बाळासाहेब मुखेकर, उषाताई बनकर यांनी केला.
............
निवडणुकीचा ठराव मांडणार
कोरोनामुळे राज्यातील सर्व संस्थांना मुदतवाढ मिळाली आहे. मात्र आमचे संचालक मंडळ बँकेच्या निवडणुकीला कधीही सामोरे जायला तयार असून, वार्षिक सभेमध्ये निवडणूक घेण्यासंबंधीचा ठराव संचालक मंडळ मांडणार आहे, असे माजी अध्यक्ष राजू राहाणे, संचालक किसन खेमनर, गंगाराम गोडे, अनिल भवार, सुयोग पवार यांनी सांगितले.