राज्यातील शिक्षकांना एका क्लिकवर पाहता येणार पगार पत्रक; बीडच्या शिक्षकाने बनविले ई-सॅलरीबुक अॅप
By अनिल लगड | Published: September 5, 2020 11:54 AM2020-09-05T11:54:56+5:302020-09-05T12:03:20+5:30
शिक्षकांना मोबाईलवर एका क्लिकवरच आपले पगार पत्रक पहायला मिळणार आहे. हिवरा-पिंपरखेड (ता. आष्टी, जि. बीड) या खेडेगावातील एका शिक्षकाने ई-सॅलरीबुक अॅप तयार केले आहे. शिक्षक वर्गात हे अॅप दोन महिन्यातच लोकप्रिय ठरले आहे.
शिक्षक दिन विशेष
अनिल लगड /
अहमदनगर : शिक्षकांना मोबाईलवर एका क्लिकवरच आपले पगार पत्रक पहायला मिळणार आहे. हिवरा-पिंपरखेड (ता. आष्टी, जि. बीड) या खेडेगावातील एका शिक्षकाने ई-सॅलरीबुक अॅप तयार केले आहे. शिक्षक वर्गात हे अॅप दोन महिन्यातच लोकप्रिय ठरले आहे.
चिंचाळा (ता. आष्टी)जिल्हा परिषद शाळेत रत्नाकर किसन चव्हाण हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. चव्हाण हे तालुकास्तरावर वेतनसंबंधी कामकाजासाठी शिक्षण विभागाला मदत करतात. काम करत असताना त्यांना असे लक्षात आले की प्रशासनातील सर्वात मोठी आस्थापना शिक्षक संवर्गाची आहे. शिक्षक खेड्यापाड्यात काम करीत असतात. त्यांचे कार्यालयाकडे येणे-जाणे नसते. यामुळे अनेक शिक्षकांना त्यांचे वेतन कसे होते हे माहित नसते. वेतनातून होणा-या शासकीय व अशासकीय कपाती समजत नाहीत. परिणामी वेतनात त्रुटी राहू शकतात. वैयक्तिकरित्या स्वत:चे वेतन स्वत:लाच पहायला मिळावे यासाठी आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या सूचनेनुसार चव्हाण यांनी सुरक्षित असे ई-सॅलरीबुक अॅप बनवले आहे.
..या सुविधा आहेत अॅपमध्ये
ई-सॅलरी बुक अॅपमध्ये प्रथम देयके तयार करणा-या व्यक्तीने आपल्याकडील वेतनाचा तपशील अपलोड करावा लागतो. अपलोड करण्यासाठी प्रत्येकाला आपला स्वतंत्र यूझर नेम व पासवर्ड तयार करावा लागतो. ते वापरुन वेतन तपशील अपलोड करता येतो. तपशीलात बदल करण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असतो. अपलोड करण्याची पध्दतही सोपी आहे. वेतन ही खासगी बाब असल्याने कुणालाही दिसू नये यासाठी अॅपमध्ये संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. आपण तयार केलेला पासवर्ड वापरुन लॉगइन झाल्यानंतरच आपले पगार पत्रक (पे स्लीप) दिसते. याशिवाय या अॅपमध्ये शिक्षकांना आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करुन दिली आहेत. यात वर्षाअखेर इन्कम टॅक्स विवरण पत्र, माय डायरी, आपल्या काही शंका असल्यास त्या लिहिण्याची सोय आहे. अॅप सुरक्षित आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.
कोरोना लॉकडाऊन काळात शिक्षकांसाठी ई-सॅलरीबुक अॅप तयार केले आहे. राज्यातील अनेक शिक्षक व वेतन देयके बनवणारे या अॅपची सुविधा मिळावी, यासाठी संपर्क करीत आहेत. आतापर्यंत २० हजार शिक्षकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. यात काही त्रुटी असतील तर त्याही दूर केल्या जातील.
-रत्नाकर चव्हाण, अॅप बनविणारे शिक्षक, हिवरा, ता. आष्टी, जि. बीड.
कोणताही अधिकारी, कर्मचारी, शिक्षक काम केल्यानंतर त्याचा मिळणारा मोबदला पाहण्यास उत्सुक असतो. त्यामुळे हे ई-सॅलरीबुक अॅप शिक्षकांच्या दृष्टीने खरोखरच चांगले आहे. यातून आर्थिक बाबतीत जागरूकता निर्माण झाली आहे.
-मुरलीधर देशमुख, सस्ती, ता.पातूर, जि. अकोला
-अनिल गुंजकर, किनवट, जि. नांदेड.
ई-सॅलरीबुक अॅप शिक्षकांसाठी खूप चांगले आहे. सुरक्षित आहे. पगाराबाबत माहिती मिळते. पगारात दुरुस्ती अथवा बदल करावयाचा असल्यास सूचनाही देता येतात. अॅप लोकप्रिय ठरत आहे. आमच्या तालुक्यात १०० टक्के शिक्षक अॅपचा वापर करीत आहेत.
-भारत शिरसाठ, मालेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर.
-अशोक वायकर, धोंडेवाडी, ता.तासगाव, जि.सांगली.