दर महिन्याला शिक्षक अदालत
By Admin | Published: May 13, 2014 11:39 PM2014-05-13T23:39:51+5:302014-05-14T00:20:57+5:30
पेन्शन अदालतीच्या धर्तीवर जिल्ह्यात दर महिन्याला प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक अदालत भरविण्यात येणार आहे.
अहमदनगर : पेन्शन अदालतीच्या धर्तीवर जिल्ह्यात दर महिन्याला प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक अदालत भरविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात आधी शिक्षकांचे तालुकास्तरावर समायोजन, त्यानंतर त्यांच्या बदल्या आणि सर्वात शेवटी पदोन्नती देण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांची संयुक्त बैठक झाली. यात आगामी वर्षाचे शैक्षणिक धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद, उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे आदी उपस्थित होते. सुरूवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांनी आगामी वर्षातील शैक्षणिक धोरणाबाबत चर्चा केली. यात आधी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावल्यास, त्यांच्याकडून गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची अपेक्षा करता येईल. नवाल यांनी जिल्ह्यातील २५ ते ३० प्राथमिक शाळांना भेट देत, त्या ठिकाणी सुरू असणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण वर्षभर जिल्ह्यात राबविण्याचा मानस बोलू दाखविला. जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये ज्या प्रमाणे पालक आणि शिक्षक यांच्यात संबंध असतात. त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि पालकांची असावी. या शाळांमध्ये वर्षातून दोनदा स्नेहसंमेलन व्हावेत, शाळेत वर्षभर राबविण्यात येणारे उपक्रम त्या गावातील चौकात फलक लावून प्रसिध्द कराव्यात. अधिकाअधिक विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे कशा प्रकारे आकर्षित होतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. संघटनेच्या वतीने बदल्यापूर्वी शिक्षकांचे समायोजन आणि पदोन्नती पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पद्वीधर शिक्षकांना विषयनिहाय पदोन्नती द्यावी लागणार आहे. यात वेळ जाणार असल्याने आधी तालुकास्तरावर समायोजन, त्यानंतर बदल्या, पदोन्नतीची प्रक्रिया राबविणार असल्याचे नवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)