शिक्षक दिन विशेष : २० रूपये पगाराचा लोकशिक्षक, भापकर गुरूजी
By चंद्रकांत शेळके | Published: September 5, 2018 11:57 AM2018-09-05T11:57:57+5:302018-09-05T11:58:27+5:30
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील राजाराम भापकर गुरूजी यांची ओळख महाराष्ट्राला, देशाला माऊंटनमॅन म्हणून असली तरी त्यांचे शैक्षणिक, सामाजिक काम आणखी व्यापक आहे.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील राजाराम भापकर गुरूजी यांची ओळख महाराष्ट्राला, देशाला माऊंटनमॅन म्हणून असली तरी त्यांचे शैक्षणिक, सामाजिक काम आणखी व्यापक आहे. शिवाय महात्मा गांधी, समाजसुधारक गाडगेबाबा, आचार्य विनोबा भावे या थोरांचा सहवास त्यांना लाभला आहे. २० रूपये पगारावर शिक्षकी पेशा पत्करलेला हा शिक्षक आज वयाच्या ८५व्या वर्षीही समाजासाठीच खस्ता खात आहे.
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे १३ नोव्हेंबर १९३३ रोजी राजाराम भापकर यांचा जन्म झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती. सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. दरम्यानच्या काळात देशात स्वातंत्र्यलढा तीव्र झाला होता. त्यामुळे ग्रामीण भागातील तरूण स्वातंत्र्यचळवळीत झपाटून उतरले होते. त्यातच महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असा नारा दिल्याने तरूण आणखीच भारावले. १९४५मध्ये नगर जिल्ह्यातील काही तरूण गांधीजींना भेटण्याच्या इच्छेने थेट पोरबंदरला (गुजरात) पोहोचले. त्यात भापकर गुरुजींचा समावेश होता. गुरूजी तेव्हा १२ वर्षांचे होते. पोरबंदरला गांधीजींशी संवाद साधण्याची संधी गुरूजींना मिळाली. ‘आपले देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढा देत आहेत. त्यात त्यांना यश येणारच आहे. तुम्हा मुलांना थेट लढ्यात सहभागी होता आले नाही तरी गावात समाजसेवा करा’, असा सल्ला गांधीजींनी दिला होता. तेव्हापासून भापकर गुरूजींना समाजसेवेची आवड लागली. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. १९५२ मध्ये भापकर गुरूजींना लोकल बोर्डात (आताचे जिल्हा परिषद) शिक्षकाची नोकरी मिळाली. मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथे ते शिक्षक म्हणून पहिल्यांदा रूजू झाले, तेव्हा त्यांचा पगार होता अवघा २० रूपये. तेथून पुढे पाच वर्षे त्यांनी याच पगारावर काम केले. दरम्यान, भापकर गुरूजींना समाजसुधारक गाडगे बाबांचाही सहवास लाभला. १९५०च्या काळात गाडगेबाबा अधूनमधून नगरला येत असत. त्यावेळी राष्ट्रीय पाठशाळा व माळीवाडा परिसरात स्वच्छतेची मोहीम होत असे. त्यात गाडगेबाबांसह भापकर गुरुजीही सहभागी होत. अशाच प्रकारे आचार्य विनोबा भावे यांना भेटण्याची संधीही मिळाली, असे गुरूजी आवर्जून सांगतात.
सामाजिक कामासाठी घालवली हयात
भापकर गुरूजींनी त्यांच्या गाव परिसरातील रस्त्याच्या कामासाठी अख्खी हयात घालवली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काम करताना त्यांनी अध्यापनासह सामाजिक कामही सुरूच ठेवले. १९९० मध्ये भापकर गुरूजी सेवानिवृत्त झाले. आपल्या ३८ वर्षांच्या सेवेतील पगार, आतापर्यंतचे २८ वर्षांतील निवृत्तीवेतन आणि वेळोवेळी मिळालेल्या पुरस्कारांची लाखो रूपयांची रक्कम त्यांनी सामाजिक कामासाठीच खर्ची केली. असा हा ध्येयवेडा शिक्षक आज वयाच्या ८५व्या वर्षीही ठणठणीत आहे. आपल्या खास जुन्या स्कूटरवरून गुंडेगाव ते नगर असा ३० किलोमीटरचा फेरफटका ते आजही आठवड्यातून एकदा मारतात. तोही सामाजिक कामासाठीच.