शिक्षक दिन विशेष : २८ वर्षे बिनपगारी नोकरी, खडू आणि फावड्याचा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:31 PM2018-09-05T12:31:26+5:302018-09-05T12:31:30+5:30
गेली अठ्ठावीस वर्षे अकरा ते पाच खडू फळा आणि सुटीच्या दिवशी व फावल्या वेळात शेतात फावडे असा दुहेरी संघर्ष करण्याची वेळ ज्ञानदान करणाऱ्या कोतूळ येथील शिवाजी विठ्ठल देशमुख व बाळासाहेब रामचंद्र बुरके या दोन शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे आली आहे.
मच्छिंद्र देशमुख
कोतूळ : गेली अठ्ठावीस वर्षे अकरा ते पाच खडू फळा आणि सुटीच्या दिवशी व फावल्या वेळात शेतात फावडे असा दुहेरी संघर्ष करण्याची वेळ ज्ञानदान करणाऱ्या कोतूळ येथील शिवाजी विठ्ठल देशमुख व बाळासाहेब रामचंद्र बुरके या दोन शिक्षकांवर शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे आली आहे.
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’ने विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यातून हे वास्तव समोर आले. कोतूळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शिवाजी देशमुख १९९० ला रूजू झाले. त्यांचे शिक्षणही बी.ए., बीपीएड, तर बाळासाहेब रामचंद्र बुरके याच शाळेत एम.ए पर्यंत शिक्षण घेऊन प्रयोगशाळा परिचर म्हणून रुजू झाले. या विनाअनुदानित शाळेला आज ना उद्या.. अनुदान मिळेल या भाबड्या आशेवर ते चक्क २८ वर्षे सेवा करीत राहिले. मात्र आज वयाची ५३ वर्षे उलटली तरी त्यांना पगार मिळेना उलट शिक्षण संस्थेची टोलवाटोलवी व शिक्षण विभागाच्या अधिकाºयांचा जाणीवपूर्वक अर्थपूर्ण खोडसाळपणामुळे या दोन शिक्षकांना अक्षरश: शेतात राबण्याची वेळ आली आहे. विनाअनुदानित शाळांमध्ये हे प्रकार सगळीकडे पहायला मिळतात. मात्र शिवाजी देशमुख यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. तरीही अजूनही पगाराची वाट पाहत आहेत. शिक्षण संस्थेत एका जागेसाठी चार-चार शिक्षक नेमण्याच्या यंत्रणेचे ते बळी ठरले आहेत. यासाठी वेळप्रसंगी बुरके व देशमुख यांनी बटईने शेती केली. तर कधी हात उसने करीत कर्ज घेतले. कधी शेतमजुरी देखील केली. हा सर्व घामाचा पैसा न्यायालयाच्या लढाईत खर्च झाला. त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. तरीही गेली अठ्ठावीस वर्षे ते संघर्ष करीत आहेत. आजही अकरा ते पाच या वेळेत ते शाळेत शिकवून पोटासाठी शेतात राबतात. शिक्षण विभाग कधी न्याय देणार या प्रतीक्षेत ते आहेत.