शिक्षक दिन : जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर
By चंद्रकांत शेळके | Published: September 4, 2022 05:55 PM2022-09-04T17:55:54+5:302022-09-04T17:56:03+5:30
१४ शिक्षक व दोन केंद्रप्रमुखांचा समावेश
अहमदनगर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून प्रत्येक तालुक्यातून एक असे १४ व २ केंद्रप्रमुख असे एकूण १६ पुरस्कार शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा पुरस्कार दिले जातात. यात प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक, तसेच दक्षिण व उत्तर असे दोन केंद्रप्रमुख अशा एकूण सोळा पुरस्कारांचा समावेश असतो. यावर्षी जिल्ह्यातून ३९ शिक्षक व ४ केंद्रप्रमुख असे ४३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी तीन शिक्षक व एक केंद्रप्रमुख यांनी नकार दिला. उर्वरित ३९ प्रस्तावांची पडताळणी शिक्षण विभागाच्या पथकाने त्या त्या शाळेत जाऊन केली. तसेच प्रस्तावाला शंभरपैकी गुणदान केले. त्यानंतर जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेत या शिक्षकांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. शेवटी १२५ गुणांमधून १४ शिक्षक व दोन केंद्रप्रमुख यांची नावे अंतिम करून हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे स्वीकृतीसाठी पाठवण्यात आला. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर या शिक्षकांची नावे शिक्षण विभागाने रविवारी दुपारी जाहीर केली.
तीनही वर्षांचे पुरस्कार वितरण एकत्रित
कोरोनामुळे मागील दोन वर्ष केवळ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले, मात्र त्याचे वितरण सार्वत्रिक कार्यक्रम घेऊन झाले नव्हते. यंदा कोरोनाचे सावट नसल्याने मागील दोन वर्षांचे व यंदाचे असे तीनही वर्षांचे पुरस्कार वितरण सार्वत्रिकरित्या येत्या पंधरा दिवसात होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.
तालुकानिहाय पुरस्कार प्राप्त शिक्षक असे
संतोष सदगीर (जि. प. शाळा, अंबड, ता. अकोले), अशोक शेटे (खांडगाव, संगमनेर), सुदाम साळुंके (गिरमेवस्ती, कोपरगाव), भीमराज शेळके (पिंपरी लोकाई, ता. राहाता), तरन्नुम खान (बेलापूर खुर्द, श्रीरामपूर), विद्याताई उदावंत (दिघेवस्ती, धानोरे, ता. राहुरी), सुमन तिजोरे (वडाळा बहिरोबा, ता. नेवासा), सविता बुधवंत (गुंफा, शेवगाव), अण्णासाहेब साळुंके (जिरेवाडी, ता. पाथर्डी), अनिता पवार (लटकेवस्ती, ता. जामखेड), नवनाथ दिवटे, माळवदे वस्ती, ता. कर्जत), भावना मोहिते (इरिगेशन कॉलनी, मढेवडगाव ता. श्रीगोंदा), ज्योती साबळे, पवारवाडी, सुपा, ता. पारनेर), शरद धलपे, काळामळा, नगर).
केंद्रप्रमुख
१) बाळासाहेब दळवी, चास, अहमदनगर
२) भाऊसाहेब गायकवाड, वांबोरी ता. राहुरी