शिक्षकाची कुटुंब दत्तक योजना ठरतेय दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:21 AM2021-05-10T04:21:20+5:302021-05-10T04:21:20+5:30
करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरात कोरोनामुळे अल्पावधीतच ५० जणांचे बळी गेले आहेत. परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून शासकीय कर्मचारी ...
करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरात कोरोनामुळे अल्पावधीतच ५० जणांचे बळी गेले आहेत. परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून शासकीय कर्मचारी स्वतः जीव धोक्यात घालून परिश्रम घेत आहेत; मात्र या कठीण काळात हातावर पोट भरणाऱ्यांची होत असलेली उपासमार पाहून आदर्श शिक्षक विजय कारखेले यांनी सुरू केलेली कुटुंब दत्तक योजना राज्याला दिशा देणारी ठरत आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असताना अनेक रुग्णांचे यात बळी गेले. करंजीसह परिसरात ५० हून अधिक रुग्ण दगावल्याची माहिती आहे. करंजीसह परिसरात सगळी गावे बंद करण्यात आली. बळीची संख्या वाढू नये म्हणून शासकीय कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कडक निर्बंधांची अंमलबजावणी करीत आहेत;मात्र अशा कठीण काळात हातावर पोट भरणाऱ्यांसाठी ही कुटुंब दत्तक योजना वरदान ठरत असून राज्याला दिशादर्शक ठरत आहे.
कुटुंब दत्तक योजना म्हणजे जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे तोपर्यंत संबंधित कुटुंबाला दत्तक घेणे म्हणजे त्या कुटुंबाला आवश्यक असणारा किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत करणे. यामुळे संबंधित कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल व संबंधित कुटुंब घरातच थांबून कोरोनाची चेन ब्रेक करतील व प्रशासनास मदत होईल. या योजनेचे अनुकरण करीत परिसरातील अनेक दानशूर व्यक्ती, मंडळे अशा कुटुंबाला मदतीचा हात देत आहेत.
प्राथमिक शिक्षक विजय कारखेले यांनी सुरू केलेल्या कुटुंब दत्तक योजनेचे राज्यभर कौतुक झाले. राज्यातील अनेक गावातील तरुण मंडळी, प्राथमिक शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, महिला मंडळी पुढे येऊन वर्गणी जमा करून गोरगरीब कुटुंबाला आधार देऊ लागले आहेत. त्यामुळे गोरगरीब कुटुंबाला खूप मोठा आधार मिळत आहे.
---
प्रत्येक गावातील अधिकारी-कर्मचारी, दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन गोरगरीब कुटुंबाला मदत केल्यास एकही कुटुंब उपाशी राहणार नाही. मी लोकांना प्रोत्साहित करून गोरगरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रवृत्त करत आहे.
-विजय कारखेले,
आदर्श शिक्षक
--
सामाजिक कार्यकर्ते कारखेले गुरुजी यांची कुटुंब दत्तक संकल्पना गोर-गरीब कुटुंबास वरदान ठरत आहे. परिसरातील अनेक लोक पुढे येत आहेत.
-बाळासाहेब अकोलकर,
सरपंच, करंजी
---
०९ करंजी मदत
कुटुंब दत्तक योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबाला मदत करताना शिक्षक विजय कारखेले.