शिक्षक संपावर, पण गावकऱ्यांनी भरवली शाळा; पोपटराव पवारांच्या गावात शिक्षण थांबेना!

By चंद्रकांत शेळके | Published: March 16, 2023 02:15 PM2023-03-16T14:15:38+5:302023-03-16T14:16:20+5:30

या शाळेत पोपटराव पवार यांच्यासह गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. 

Teachers on strike, but villagers fill school; Education does not stop in Poptrao Pawar's village hiwarebazar | शिक्षक संपावर, पण गावकऱ्यांनी भरवली शाळा; पोपटराव पवारांच्या गावात शिक्षण थांबेना!

शिक्षक संपावर, पण गावकऱ्यांनी भरवली शाळा; पोपटराव पवारांच्या गावात शिक्षण थांबेना!

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : संपूर्ण राज्यभर सरकारी कर्मचार्‍यांचा संप चालू असल्याने शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे मात्र आदर्श गाव हिवरे बाजार येथे ग्रामस्थच अध्यापनाचे काम करत असल्याने येथील शाळा बंद झालेली नाही. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या या अनोख्या उपक्रमाचे राज्यभर स्वागत होत आहे. प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांचाही संपात सहभाग असून सध्याचा कालखंड हा विद्यार्थ्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असून ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांनी संप पुकारल्याने विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव  हिवरेबाजार येथील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, सोसायटी सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य व गावातील सुशिक्षित पालक तसेच कोविड काळातील फ्रंटलाईन टिम यांनी शिक्षकांच्या गैरहजेरीत अध्यापनाचे काम सुरु केले आहे.

कोविड काळात सुद्धा संपूर्ण देशभर शाळा बंद असताना हिवरे बाजार मध्ये १५ जून ते १५ एप्रिल या शैक्षणिक वर्षात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून ऑफलाईन शाळा सुरू ठेवण्यात आली होती. त्याचाच परिणाम प्राथमिक शाळेतील २४ विद्यार्थी स्कॉलरशिप  परीक्षेत व यशवंत माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटकातील १४ विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. ग्रामीण भागात शाळेतील सर्व विद्यार्थी हे शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. त्यांना इतर खाजगी क्लासेस वगैरे सोयी उपलब्ध  नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य हे शिक्षकांवर आणि शाळेवरच अवलंबून असते. तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हिवरेबाजार ग्रामस्थांनी शाळा सुरू ठेवल्या आहेत.  प्राथमिक शाळा सकाळी ७.३० ते ११ व माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते १२ या वेळेत भरतात. 

दरम्यान, संपात जे शासकीय कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Teachers on strike, but villagers fill school; Education does not stop in Poptrao Pawar's village hiwarebazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.