शिक्षकांनी कोविडसाठी उभारला एक कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:32+5:302021-05-09T04:21:32+5:30

दोन महिन्यांत जिल्ह्यात कोराेना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या महामारीत जिल्हावासीयांना दिलासा देण्यासाठी अन्य घटकांसोबत जिल्ह्यातील प्राथमिक ...

Teachers raised Rs 1 crore for Kovid | शिक्षकांनी कोविडसाठी उभारला एक कोटीचा निधी

शिक्षकांनी कोविडसाठी उभारला एक कोटीचा निधी

दोन महिन्यांत जिल्ह्यात कोराेना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या महामारीत जिल्हावासीयांना दिलासा देण्यासाठी अन्य घटकांसोबत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक स्वत:हून पुढे आले आहेत. त्यांनी कोविड सेंटर आणि कृतज्ञता निधीच्या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे. जिल्ह्यातील या सर्व शिक्षकांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत पारित करण्यात आला.

उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची मासिक सभा ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे पार पडली. यावेळी जागतिक महामारीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील शिक्षक, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक (शालेय पोषण आहार), विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कोविड सेंटर उभारणी व कृतज्ञता निधी उभारून उल्लेखनीय काम केले. शिक्षकांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिकचा निधी कोविड उपचारासाठी मिळाल्याबद्दल शिक्षण समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाता यावे, शैक्षणिक गुणवत्तावाढ होण्यासाठी इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर इयत्ता ४ थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर टॅलेंट सर्च या उपक्रमांतर्गत २०२१-२२ पासून जानेवारी महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा नगर जिल्हा परिषद स्वतंत्रपणे घेणार असून कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर परीक्षेच्या स्वरूपाचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात जूनपासून शाळा सुरू होण्यापूर्वी दखलपात्र विद्यार्थ्यांची १०० टक्के शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवून त्यांना ३१ मे पूर्वी शाळेत दाखल करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिका-यांना देण्यात आल्या. या ऑनलाइन सभेला सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, मिलिंद कानवडे, धनजंय गाढे, गणेश शेळके, उज्ज्वलाताई ठुबे, विमलताई आगवण, सुवर्णाताई जगताप हजर होते. यासह प्रभारी शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ, १४ तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिनाअखेरीस सेवानिवृत्त होणारे गुलाब सय्यद आणि सर्वशिक्षा अभियानाचे लेखाधिकारी सुरेश हजारे यांचा सन्मान करण्यात आला.

................

शिल्लक पोषण आहाराचे वाटप

जिल्ह्यात अनेक ठिकाणी शालेय पोषण आहारातील तांदूळ आणि कडधान्य शिल्लक आहे. शिल्लक असणारा पोषण आहारवाटप करण्यासाठी जिल्हा परिषद विभागाने शिक्षण संचालक यांच्याकडे परवानगी मागितली होती. ती परवानगी मिळाल्याने आता या पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना घरपोच वाटप होणार आहे.

Web Title: Teachers raised Rs 1 crore for Kovid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.