शिक्षकांना कोरोना लसीचा लाभ मिळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:38+5:302021-03-08T04:21:38+5:30
शेवगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक हे केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोफत कोराना लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना ...
शेवगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक हे केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोफत कोराना लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना लसीकरणाचा लाभ मिळावा, अशी मागणी शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी केली असून, या मागणी संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
१६ जानेवारी २०२१ पासून फ्रंटलाइन वर्कर म्हणून कोरोना संकट काळात सेवा बजावणाऱ्या कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर यांना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शासकीय लसीकरण मोहीम मोफत स्वरूपात सुरू झाली. कोरोना काळात मागील २०२० व २०२१ मध्ये तालुका व जिल्हा सीमेवर, रेशन दुकानावर, विलगीकरण कक्षात, कोरोना सेंटर आयुर्वेद कॉलेज, शेवगाव, कोरोना सेंटर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव येथे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून सेवा बजावली. मात्र शिक्षक लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. कोरोना संकट काळात सेवा बजावणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मोफत लसीकरणाचा लाभ मिळावा. आरोग्य वा तहसील विभागाने लिंक भरण्यासासाठी वेबसाइट माहिती दिली नव्हती. ती लिंक त्वरित जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेनदनावर शिक्षक नेते प्रकाश लबडे, राजू ढोले, बापूराव आर्ले, राजन पाटील ढोले, रामकृष्ण काटे, रावसाहेब बोडखे, अस्मान सुपेकर, संदीप कातकडे, विठ्ठल मार्कंडे, गणपत दसपुते, बाळासाहेब वाघुंबरे, विष्णू वाघमारे, रेश्मा धस, मनीषा हरेल, सुंदर सोळंके, संजय भालेकर, अरुण पठाडे, मच्छिंद्र भापकर, पालवे आदींच्या सह्या आहेत.