शिक्षकांनी गिरवले योग, प्राणायामचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:05+5:302021-05-30T04:18:05+5:30
अहमदनगर : ॲक्टिव्ह टीचर इंडिया, ॲक्टिव्ह टीचर महाराष्ट्र, निशंक महाराष्ट्र आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...
अहमदनगर : ॲक्टिव्ह टीचर इंडिया, ॲक्टिव्ह टीचर महाराष्ट्र, निशंक महाराष्ट्र आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवचेतना योग, प्राणायाम शिबिरात मोरोक्को देशातील मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या योग शिक्षिका व मूळच्या अहमदनगरच्या रचना सदाफुले-फासाटे यांनी भारतातील शिक्षकांना योग, प्राणायामचे ऑनलाइन धडे दिले. २१ ते २५ मे या कालावधीत हे मोफत पाच दिवसीय शिबिर घेण्यात आले. या शिबिरातून शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना रोगमुक्त जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
‘कोरोनाचा हा काळ म्हणजे आपल्या सर्वांची शारीरिक आणि मानसिक परीक्षा पाहणारा आहे. अशा वातावरणात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र आणि निःशंक महाराष्ट्र परिवाराने आयोजित केलेले नवचेतना योग प्राणायाम शिबिर शिक्षकांसाठी नवसंजीवनी ठरेल यात शंका नाही, असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणेचे संचालक दिनकर टेमकर यांनी शिबिराच्या समारोपप्रसंगी सांगितले.
या शिबिरात प्रात्यक्षिकांसह सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम, आसने इत्यादींची सोप्या पद्धतीने फासाटे यांनी माहिती दिली. ऑक्सिजनची पातळी वाढवणे, फुप्फुसांची क्षमता वाढवणे, वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्यासाठी योग- प्राणायामाचे महत्त्व त्यांनी विषद केले. तसेच हितेश पनेरी (राजस्थान), डॉ. पवन सुधीर (एनसीईआरटी, नवी दिल्ली), डॉ. प्राची साठे (मुंबई), शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सकारात्मक विचारांची पेरणी केली.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका ज्योती बेलवले, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक एटीएमचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ तसेच उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ, नारायण मंगलारम, ज्ञानदेव नवसरे, उमेश कोटलवार, नदीम खान, तंत्रसहाय्य करणारे गजेंद्र बोंबले, नितीन अंतरकर यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.