वन्यजीवांची तहान भाविण्यासाठी सरसावले शिक्षक, तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:20 AM2021-04-11T04:20:19+5:302021-04-11T04:20:19+5:30
टाकळीमानूर : वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील शिक्षक, तरुण सरसावले आहेत. खरवंडी कासार, जवळवाडी येथील शिक्षकांनी भगवानगड परिसरातील पाणवठ्याची ...
टाकळीमानूर : वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील शिक्षक, तरुण सरसावले आहेत. खरवंडी कासार, जवळवाडी येथील शिक्षकांनी भगवानगड परिसरातील पाणवठ्याची दुरुस्ती केली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या काहिलीत वन्यप्राण्यांच्या पाण्याची सोय झाली आहे. वन्यप्राण्यांची भटकंतीही थांबणार आहे.
दोन वर्षांपूर्वी भगवानगड परिसरातील गावांमधील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीतून वन्यप्राणी, पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी भगवानगड डोंगर परिसरात पाणवठा बांधला होता. संत भगवानबाबा वन्यजीव पाणवठा असे त्याचे नामकरणही केले होते. तहान भागविण्यासाठी पाणवठ्यावर आलेल्या अनेक वन्यप्राण्यांचे दर्शन रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाटसरूंना सतत होते. काही समाजकंटकांनी पाणवठा फोडून आपल्यातील विकृतीचे दर्शन घडविले. पाणवठा तुटल्याने त्यात पाणी राहिले नाही.
गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने पाण्यासाठी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू झाली. ही गोष्ट लक्षात येताच खरवंडीतील नितीन खेडकर यांनी पाणवठा दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. ही बाब त्यांनी शिक्षक मित्र पांडुरंग खेडकर, दादा अंदुरे, अमोल ढाकणे, गणेश कांबळे, रवि गोल्हार यांना सांगितले. यांनी सर्वांनी एकत्र येऊन पाणवठ्याची दुरुस्ती केली. पाणवठ्यात टाकलेले दगडगोटे, माती, कचरा याची साफसफाई केली. त्यानंतर यामध्ये पाणी सोडण्यात आली.
--
१० टाकळीमानूर पाणवठा
भगवानगड डोंगर परिसरातील पाणवठा दुरुस्त करताना शिक्षक व तरुण.