'अहो सोडा मला.. इंग्लिश शिकवून सोडा.....'
By नवनाथ कराडे | Published: September 20, 2017 07:59 PM2017-09-20T19:59:49+5:302017-09-20T20:47:09+5:30
शिक्षणावर भाष्य करणा-या चित्रपटाचे लेखन - दिग्दर्शन पंचवीशीतील महेश रावसाहेब काळे याने केले आहे. चित्रपटातून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 'इंग्रजी मिडियमच्या स्कूल'धील फरकाचे वास्तव महेशने मांडले आहे. सद्यस्थितीत या चित्रपटातील 'मला इंग्लिश शिकवून सोडा' या लावणीचा आॅडीओ सध्या सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असून पसंतीस उतरत आहे
नवनाथ खराडे,
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : लावणी हा महाराष्ट्राच्या मातीमधील कलाप्रकार. शृंगाराची खाण असणारी लावणी महाराष्ट्राची शान. लास्य रसाचे दर्शन घडविणारा लोकप्रिय लोककलेचा प्रकार. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. हाच त्रिवेणी संगम 'घुमा' चित्रपटातील 'मला इंग्लिश शिकवून सोडा' या लावणीतून लवकरच अनुभवायला मिळणार आहे.
लवकरच 'घुमा' चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. शिक्षणावर भाष्य करणा-या चित्रपटाचे लेखन - दिग्दर्शन पंचवीशीतील महेश रावसाहेब काळे याने केले आहे. चित्रपटातून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 'इंग्रजी मिडियमच्या स्कूल'धील फरकाचे वास्तव महेशने मांडले आहे. सद्यस्थितीत या चित्रपटातील 'मला इंग्लिश शिकवून सोडा' या लावणीचा आॅडीओ सध्या सर्वांचे लक्ष्य वेधून घेत असून पसंतीस उतरत आहे. लावणीच्या आॅडिओने प्रेमात पडलेले रसिकांना व्हिडीओची उत्सुकता आहे. व्हिडीओ आल्यानंतर रसिकांना त्रिवेणी संगमाचा अविष्कार लुटता येणार आहे. गीत, नृत्य आणि अदाकारी या तीनही बाजू लावणीत सक्षमपणे साकारल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द गीतकार गुरू ठाकूर यांनी लावणी शब्दबध्द केली आहे. ऋषिकेश, सौरभ अन जसराज जोशी यांनी संगीत दिले असून प्रिया बर्वे यांच्या आवाजाने रंगत आली आहे. फुलवा खामकरच्या कोरिओग्राफीवर वैशाली जाधवने नृत्याविष्कार साकारला आहे. वैशाली जाधव ढोलकीची तालावरची विजेती असल्याने लावणीत अदाकारीची चांगलीच इंग्लिश शिकली आहे. त्यामुळे ही लावणी एकदा पाहून हौस भागणार नसून परत परत पाहावी लागणार हे मात्र नक्की. हीच लावणी चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
लावणीचे बोल
कधी एल यू एल यू म्हणतयं
कधी नुसतचं मिस यू धाडतयं
रोज मेसेजमंदी राया, काय कळना इंग्लिश धाडतयं...
कसं जाणावं त्याच्या मनातलं..
या भाषेनं केलाय राडा
अहो सोडा मला.. इंग्लिश शिकवून सोडा.....