बुद्धांची शिकवण आणि आपले आचरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:20 AM2021-05-23T04:20:02+5:302021-05-23T04:20:02+5:30

------------- तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानतंतर सारनाथ येथे आपल्या पहिल्या प्रवचनातून त्यांनी अखंड समजाला उद्धाराकडे नेण्याचा मार्ग आपल्या ...

The teachings of the Buddha and our conduct | बुद्धांची शिकवण आणि आपले आचरण

बुद्धांची शिकवण आणि आपले आचरण

-------------

तथागत गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानतंतर सारनाथ येथे आपल्या पहिल्या प्रवचनातून त्यांनी अखंड समजाला उद्धाराकडे नेण्याचा मार्ग आपल्या पाच जुन्या सोबत्यांना सांगितला. हे प्रवचन देताना बुद्ध असे सांगतात की, माणूस आणि त्याचे जगातील नाते हा या धम्माचा (बुद्ध धमाचा) उद्देश आहे. कोणत्याही समाजव्यवस्थेमध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू ठेवून त्याचा सर्वागीण उद्धार हाच त्या व्यवस्थेचा अंतिम उद्देश असला पाहिजे. परंतु भारतासारख्या देशामध्ये जाती, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्था व्यक्ती-व्यक्तीमध्ये विषमता व भेदभाव निर्माण करते. बुद्धांनी आपल्या पहिल्याच उपदेशामध्ये मानवी समाजात असलेल्या विषमतेचे वर्णन करताना सांगितले की, मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे; याचाच अर्थ दुःख आणि दारिद्र्य ही व्यक्तीला आणि परिणामी समाजाला अधोगतीकडे नेणारे मार्ग आहेत. बुद्धांच्या या वाक्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सखोल अभ्यास करून या उपदेशाची समकालीन समाजव्यवस्थेशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘दुःख’ या शब्दाच्या माध्यमातून समाजात अस्तित्वात असलेल्या पिळवणुकीचा संदर्भ दिलेला आहे. त्यांच्या मते समाजातील व्यक्तीमध्ये आसक्ती (हाव) हा पिळवणुकीचा मूळ पाया आहे. कोणत्याही गोष्टीविषयी असणारी हाव (लालच) समाजातील एका वर्गाला मालकी हक्क देते तर दुसऱ्या वर्गाला शोषणयुक्त जीवनपद्धती जगण्यासाठी भाग पाडते. यावरून आपणास असे लक्षात येते की कोणत्याही संसाधनाची मालकी किंवा समाजव्यवस्थेवर असणारी मालकी ही एक प्रकारची आसक्ती असून त्यामुळे समाजामध्ये भेदभाव आणि विषमता निर्माण होते.

बुद्धांच्या मते खासगी मालकी समाजातील एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख (शोषण/पिळवणूक) देते. बुद्ध फक्त समाजातील या विषमतेविषयीचे विश्लेषण करून थांबले नाही तर त्यांनी ती विषमता नष्ट करण्यासाठी सदाचाराचा मार्ग सांगितला. हा सदाचाराचा मार्ग समाजातील अन्याय दूर करून समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यास मदत होईल असे त्यांना वाटत असे. म्हणून त्यांनी मैत्री व प्रज्ञा या दोन गोष्टींवर भर दिलेला आहे. मैत्रीच्या माध्यमातून समाजामध्ये बंधुभाव निर्माण होण्यास मदत होईल कारण मैत्रीमध्ये कुणीही उच्च किंवा कनिष्ठ नसतो, सर्वांना समान अधिकार, समान संधी व समान स्थान प्राप्त होतात. तर समाजातील अज्ञान (अविद्या) नष्ट करून जोपर्यंत व्यक्ती सुज्ञ होत नाही तोपर्यंत तो नेहमी दुःखात जगत राहील. याचाच अर्थ जोपर्यंत व्यक्ती आपल्या पिळवणुकीविषयी जागरूक होत नाही तोपर्यंत समाजामध्ये विषमता कायम टिकून राहील. म्हणून बुद्धांनी आपल्या त्रिसरणामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान हे प्रज्ञेला दिले आहे. प्रज्ञा म्हणजे सम्यक ज्ञान. या सम्यक ज्ञानाच्या माध्यमातून समाजात वावरत असताना चांगल्या-वाईट, चूक-बरोबर, न्याय-अन्याय, कुशल-अकुशल, इ. कृतीमध्ये फरक करून त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करणे म्हणजेच बुद्धांच्या मते प्रज्ञा होय. बुद्धांच्या मते "ज्या प्रमाणे माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे प्रज्ञेचीही व्यक्तीला आवश्यकता असते".

शिक्षण हे फक्त अर्थार्जन करण्याचे साधन नसून ते व्यक्तीच्या दु:खाचा अंत करणारे एक क्रांतिकारी शस्त्र आहे हे युवकामध्ये रूढ होण्याची गरज आहे. एक धर्म म्हणून नव्हे तर एक जीवन जगण्याची पद्धत म्हणून बुद्धांच्या विचारसरणीच्या आधारे आपले आचरण करण्याची नितांत गरज आहे. बुद्धांनी दिलेल्या मूल्यांची व विचारसरणीची वैज्ञानिक दृष्टिकोनातून समज करून आजच्या तरुण पिढीने सम्यक मार्ग आत्मसात करणे गरजेचे आहे.

-प्रदीप जारे

(लेखक सी. एस. आर. डी. अहमदनगर येथे समाजकार्याचे सहायक प्राध्यापक आहेत.)

Web Title: The teachings of the Buddha and our conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.