पुन्हा दृष्टी लाभल्याने आजीबाईंच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:51+5:302021-03-29T04:15:51+5:30
केडगाव : एक वर्षापूर्वी काचबिंदूने अंधत्व आलेल्या मुक्ताबाई धाडगे या आजीबाईंना फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोफत मोतिबिंदू ...
केडगाव : एक वर्षापूर्वी काचबिंदूने अंधत्व आलेल्या मुक्ताबाई धाडगे या आजीबाईंना फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली. निकामी झालेल्या डोळ्यास पुन्हा दृष्टी लाभल्याने आजीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
फिनिक्स सोशल फाउंडेशनने नागरदेवळे (ता. नगर) येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात बुऱ्हाणनगर येथील मुक्ताबाई धाडगे (वय ६३) या आजीबाई दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्याने हजर झाल्या होत्या. त्यांची तपासणी केली असता एक डोळ्यात काचबिंदूचा अंतिम टप्पा तर दुसऱ्या डोळ्यास पडदा आल्याने अंधत्व आल्याचे निष्पन्न झाले. टाळेबंदीनंतर आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने काचबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार होता. मुक्ताबाईंना हा खर्च पेलवणार नसल्याने त्यांनी फिनिक्स फाउंडेशनच्या शिबिरात डोळ्यावर उपचार करण्याची विनंती केली. त्यांच्या डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांना आनंदऋषीजी नेत्रालयात शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. मात्र एक डोळ्यात काचबिंदूचा अंतिम टप्पा असल्याने या अवघड शस्त्रक्रियेत डोळा निकामी होण्याची भीती डॉक्टरांनी वर्तवली. शेवटी नाईलाजाने डोळा काढण्याची डॉक्टर व रुग्णांची तयारी झाली होती. पाच ते सहा दिवस त्यांचा डोळा वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करून विविध चाचण्या करण्यात आल्या.
सात दिवसानंतर ही काचबिंदूची अवघड शस्त्रक्रिया डॉ. नेहा भारडिया यांनी यशस्वी केली. यामध्ये डोळा वाचून आजीबाईंना नवदृष्टी लाभली. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन परतलेल्या आजीबाईंचा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी सन्मान केला.
--
फिनिक्सची माणुसकीची भावना..
डोळा न दुखता चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून डोळ्याने चांगले पाहता येत आहे. माणुसकीच्या भावनेने फिनिक्स फाउंडेशनने केलेल्या सहकार्यामुळे ही नवदृष्टी मिळाल्याची भावना मुक्ताबाई धाडगे यांनी व्यक्त केली.
--
२७ फिनिक्स