तहसीलदार ज्योती देवरेंच्या भ्रष्ट्र कारभाराची चौकशी करा, सरोदेंमार्फत एसीबीकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 12:21 PM2021-09-14T12:21:14+5:302021-09-14T12:42:12+5:30
या तक्रारीसंदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले की, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे.
अहमदनगर : पारनेर येथील वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी जातेगाव (ता. पारनेर) येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना मंगळवारी तक्रार अर्ज देण्यात आला.
या तक्रारीसंदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले की, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे. या अहवालात देवरे यांनी वाळूउपसा केलेली वाहने जप्त केल्यानंतर कुठलेही सरकारी शुल्क भरून न घेता ती वाहने सोडून दिली, अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे तसेच देवरे या जळगाव येथे कार्यरत असतानाही भ्रष्टाचार केल्याच्या बाबी अहवालात नमूद आहेत. देवरे यांची बदली झालेली असली तरी कामाचे स्वरूप तेच राहणार आहे. त्यामुळे देवरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पोटघन यांची आहे.
दरम्यान, देवरे यांची आत्महत्या करण्यासंदर्भात व्हायरल झालेल्या क्लिपकडे सरोदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, महिलांना कार्यालयस्थळी कामकाज करताना बहुतांशवेळा दबाव, त्रास सहन करावा लागतो. हे वास्तव आहे पण कुणाच्याही भ्रष्टाचाराची पाठराखण करता येणार नाही. देवरे यांनीही आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर वकील म्हणून मी त्यांच्या पाठीमागे उभा राहील पण, त्यांनी आपल्या महिला असल्याचा गैरफायदा घेऊ नये, असे यावेळी ॲड. सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.