बोगस पेट्रोल विकणा-या चालकाही तहसीलदारांनी केली धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 12:52 PM2020-03-26T12:52:08+5:302020-03-26T12:52:52+5:30
श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. संचारबंदीचे आदेश असतानाही मोटारसायकलस्वारांना बेफिकीरपणे पेट्रोल वाटप करताना पकडले. पेट्रोल पंपाचे मालक मडके यांची तहसीलदारांनी चांगली धुलाई केली.
श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. संचारबंदीचे आदेश असतानाही मोटारसायकलस्वारांना बेफिकीरपणे पेट्रोल वाटप करताना पकडले. पेट्रोल पंपाचे मालक मडके यांची तहसीलदारांनी चांगली धुलाई केली. या पंपाला १५ एप्रिलपर्यंत पंप सील ठोकण्यात आले आहे.
श्रीगोंदा तालुक्यात सुमारे २७ पेट्रोल पंप आहेत. हे पंप पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले. खाजगी मोटारसायकल व चारचाकी वाहने, खासगी बसला पेट्रोल, डिझेल देऊ नये, असे लेखी आदेश दिले असताना पेट्रोल पंपाचे मालक नियमाचा भंग करीत आहेत. तहसीलदार महेंद्र महाजन यांनी गुरुवारी सकाळी श्रीगोंदा शहरातील चंद्रमा व कानन पेट्रोल पंपावर पाहणी केली. खाजगी वाहनांना पेट्रोल डिझेल देऊ नये, अशी समज दिली. नंतर पारगाव सुद्रिक येथील यशश्री पेट्रोल पंपावर छापा टाकला. येथील सावळागोंधळ पाहून पेट्रोल पंप मालकाची धुलाई केली. काही काही जणांनी पेट्रोल ड्रममध्ये विक्रीसाठी चालविले होते. त्यांनाही बदडले. तहसीलदार महेंद्र महाजन यांच्याबरोबर आरटीओचे पथक होते. या पथकाने मोकाट फिरणाºया वाहनांवर कारवाई केली.