हनुमानाचे मंदिर.. आंब्याचे झाड.. पानमळे.. नसलेले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 03:08 PM2019-07-14T15:08:32+5:302019-07-14T15:09:37+5:30
हलत्या दीपमाळांसाठी प्रसिद्ध असलेल्या राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा देवीवरील पारंपरिक श्रद्धेपोटी गावशिवेच्या आत आंब्याचे झाड,
विश्वास रेणूकर
राशीन : हलत्या दीपमाळांसाठी प्रसिद्ध असलेल्या राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा देवीवरील पारंपरिक श्रद्धेपोटी गावशिवेच्या आत आंब्याचे झाड, पानमळे लावले जात नाहीत. याशिवाय हनुमान मंदिराची उभारणीही केली जात नाही.
पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले भौगोलिकदृष्ट्या बारा वाड्या व तेरावे राशीन अशी गावाची ओळख सांगितली जाते. गावाची लोकसंख्या ४५ हजार आहे. गावात देवीच्या हेमाडपंथी मंदिराबरोबरच विष्णू, काशीविश्वेवर महादेव मंदिरासह पुरातन मठ, समाधी मंदिरे आहेत. देवी मंदिरावरील हेमाडपंथी शिखराचा बारा वर्षापूर्वी जीर्णोद्धार झाला. त्यावर पाच फुटी पंचधातूसह सोन्याचा कळस बसविण्यात आला आहे. मंदिरातील कल्लोळतीर्थ, नगारखाने वैगरेंचा जीर्णोद्धार लोकसहभागातून केला गेला आहे.
देवीच्या अवतार कार्यापासूनच तिच्या कार्यक्षेत्रात हनुमानाचे मंदिर नसल्याने गावात नवीन मंदिर बांधत नाहीत. पूर्वीपासूनच गाव परिसरात आंब्याचे झाड व विड्याच्या पानाचे मळे लागवड केली जात नाही. देवीवरील श्रद्धेपोटी ही पंरपरा आजही पाळली जाते. एकंदरीतच येथील वेगवेगळ्या परंपरा जपवणूकीमुळे गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
दुमजली घरे न बांधण्याची प्रथा मोडीत
राशीन येथे विविध परंपरा जपवणूकीबरोबरच येथे दुमजली घरे न बांधण्याचीही प्रथा होती. परंतु, या प्रथेला काही प्रमाणात छेद देत व्यावसायिक अगर भौगोलिक क्षेत्राच्या कारणामुळे दुमलजी इमारती होऊ लागल्या आहेत. मात्र काही जुन्या पिढीतील ग्रामस्थांचा याला विरोध आहे.