साईनगरीत मंदिर रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:20 AM2021-03-31T04:20:27+5:302021-03-31T04:20:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : साईनगरीत सध्या मंदिर रिकामे व कोविड रूग्णालय हाऊसफुल अशी स्थिती आहे. त्यातच प्रशासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : साईनगरीत सध्या मंदिर रिकामे व कोविड रूग्णालय हाऊसफुल अशी स्थिती आहे. त्यातच प्रशासनाने पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध न करताच गृहविलगीकरण सुविधा बंद केल्याने रूग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. साईबाबांच्या रूग्णसेवेचा वारसा सांगणाऱ्या साई संस्थानसाठी हा कसोटीचा प्रसंग आहे.
दर्शन व्यवस्थेसह प्रत्येक बाब दुय्यम समजून प्राधान्याने रूग्णसेवेवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. अन्यथा अनेक गोरगरिबांचे उपचाराअभावी जीव जातील, जे वाचतील ते कर्जबाजारी झालेले असतील. अशावेळी संस्थान व्यवस्थापन व प्रशासनाने एकदिलाने ठाम भूमिका घेऊन तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर ती प्रत्यक्ष साईबाबांशी व आपल्या पदाशी प्रतारणा ठरेल.
संस्थानने तातडीने दोन्ही नॉन कोविड रूग्णालयांपैकी एक रूग्णालय बंद करून किंवा तातडीच्या सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवून तेथील स्टाफ कोविड रूग्णालयाला पाठवणे, औषधे, मास्क, हॅन्डग्लोज, पीपीई कीटसह अन्य उपकरणे खरेदीसाठी संस्थानला टेंडरची अडचण असते. प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भाविकांना आवाहन करून या वस्तू थेट मिळवणे, नर्सिंग कॉलेजमधील ट्रेनी नर्सेसची सेवा घेणे आदी उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.
कोविड सेंटरला औषधे व स्टाफचा भयंकर तुटवडा आहे. ऑक्सिजनची मागणी वाढली असून, यासाठी संगमनेहून रोज वाहतूक सुरू आहे. तेथेही ऑक्सिजन मिळवण्यासाठी वेटिंग आहे. आरोग्य विभागाकडून पुरेसे डॉक्टर्स व औषधे उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यातच प्रशासनाने गृह विलगीकरणाची सुविधा बंद केली आहे. डॉ. किरण गोरे सारखे या सेंटरला रोज सायंकाळी थोडावेळ सेवा देत आहेत. या डॉक्टरांनी उपचार सुचवले तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरेसा नर्सिंग स्टाफ नाही. शिर्डी व तालुक्यात रोज सरासरी सव्वाशे ते दीडशे अधिकृत रूग्ण आढळत आहेत. प्रत्यक्षातील आकडा कितीतरी मोठा आहे.
....
कोविड सेंटरला सामान्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रूग्णांसाठी २२० खाटा आहेत. अत्यवस्थ रूग्णांसाठी पन्नास आयसीयू बेडची सुविधा होती. आता ती पासष्ट करण्यात आली आहे. येथे केवळ तीन व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. बेडची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
-डॉ़. प्रीतम वडगावे, वैद्यकीय संचालक, साई संस्थान रूग्णालय, शिर्डी.