बसला टेम्पो धडकला; टायर पंक्चर काढणारा बसचालक ठार
By शेखर पानसरे | Published: August 12, 2023 04:18 PM2023-08-12T16:18:39+5:302023-08-12T16:18:55+5:30
नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोची (एच. आर. ४७, ई. ४०७८) ची टायर पंक्चर झालेल्या नंदूरबार-पुणे बसला जोराची धडक बसली.
घारगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाल्याने बसचालक पंक्चर काढण्यासाठी जॅक लावत होता, त्यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोची बसला जोराची धडक बसली. यात बसचालक ठार झाला. हा अपघात शनिवारी (दि.१२) पहाटे ३. ५५ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल नांदूरखंदरमाळ येथे घडला.
मयूर आनंदा मुंढे (वय ४५, रा. दत्तचौक, सिडको, नाशिक) असे अपघातातील मयत बस चालकाचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलिस ठाण्यात बसवाहक संदीप नामदेव खोडे (रा. सातपूर, जि. नाशिक) यांनी खबर दिली आहे.
नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोची (एच. आर. ४७, ई. ४०७८) ची टायर पंक्चर झालेल्या नंदूरबार-पुणे बसला (एम. एच. २०, बी. एल. ४०९४) जोराची धडक बसली. या अपघातात पंक्चर काढत असलेले चालक मुंढे गंभीर जखमी झाले. वाहक खोडे यांनी नवापूर-पुणे बसचे चालक अरुण शेलार यांच्याशी संपर्क करत त्यांना अपघात घडल्याचे सांगत पाठीमागे बोलावून घेतले. शेलार हे बस घेऊन आल्यानंतर जखमी मुंढे यांना उपचारासाठी बसमधून आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.