Coronavirus : सायंकाळपासून अत्यावश्यक सेवा तात्पुरत्या बंद; उद्या सकाळपासून होणार पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 03:31 PM2020-04-09T15:31:03+5:302020-04-09T15:35:30+5:30
मुस्लिम बांधवांच्या शब्बे-ए-बारात या सणानिमित्त अत्यावश्यक सेवा आज सायंकाळी सहापासून शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.
अहमदनगर : मुस्लिम बांधवांच्या शब्बे-ए-बारात या सणानिमित्त अत्यावश्यक सेवा आज सायंकाळी सहापासून शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच दुकाने, अस्थापना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. आज गुरुवारी मुस्लिम बांधवांचा शब्बे-ए-बारात हा सण आहे. त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा आज सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी सहापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज काढला. अत्यावश्यक सेवेत किराणा दुकाने, दूध, दुग्ध उत्पादने, फळे व भाजीपाला औषधालय आदींचा समावेश आहे.
शुक्रवारी (दि. १०) सकाळी सहा वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा पूर्ववत होणार आहेत. अत्यावश्यक सेवा केवळ १२ तास बंद आहेत, असे या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, शब्बे-ए-बारात हा सण मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच राहून साजरा करायचा आहे. कोठेही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले आहे.