Ahmednagar : दहा वर्षांच्या स्वरूपने सर केली हिमालयातील शिखरे; एकाच मोहिमेत दोन शिखरे चढणारा पहिलाच भारतीय बाल गिर्यारोहक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 06:34 AM2021-10-30T06:34:55+5:302021-10-30T06:36:15+5:30
Ahmednagar : शिर्डीजवळील वाकडी या गावातील स्वरूप सध्या पुण्यात राहतो. पोलीस निरीक्षक असलेली व हिमालयातील मीरा पीक सर केलेली आपली आजी द्वारका डोखे यांच्याकडून त्याला प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली़.
- प्रमोद आहेर
शिर्डी (जि. अहमदनगर) : वयाच्या अवघ्या १० वर्षी स्वरूप प्रवीण शेलारने हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील पीरप्रांजल पर्वतरांगेतील मा पतालसु व मो फ्रेंडशिप ही दोन्ही हिमाच्छादित शिखरे यशस्वीपणे सर केली. पतालसु शिखर १३ हजार ९४४, तर फ्रेंडशिप हे तब्बल १७ हजार ३४६ फूट उंच आहे. दि. ५ व ११ ऑक्टोबर रोजी दोन्ही शिखरांना गवसणी घातली. या वयात एकाच मोहिमेत दोन शिखरे सर करणारा स्वरूप पहिलाच भारतीय बाल गिर्यारोहक ठरला आहे.
शिर्डीजवळील वाकडी या गावातील स्वरूप सध्या पुण्यात राहतो. पोलीस निरीक्षक असलेली व हिमालयातील मीरा पीक सर केलेली आपली आजी द्वारका डोखे यांच्याकडून त्याला प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली़. सध्या द्वारका डोखे एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी मनालीत प्रशिक्षण घेत आहेत. स्वरूपला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तपणे बागडणे आणि डोंगरदऱ्यात चढाई करणे आवडते. वयाच्या ७व्या वर्षीच त्याने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर करून गिर्यारोहणाच्या ध्येयाचा श्रीगणेशा केला.
१६ सदस्यांचा सहभाग
नुकतीच ड्रीम ॲडव्हेंचरने पतालसु, फ्रेंडशिप व शितीधर शिखरांची मोहीम आयोजित केली होती. १६ सदस्यांचा सहभाग असलेल्या या मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले एव्हरेस्टवीर औरंगाबादचे रफिक शेख यांनी केले. शिखरे सर करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच कमी वयात स्वरूपने ही शिखरे सर केली.