अहमदनगर शहरातील भुयारी गटार योजनेची १३१ कोटींची निविदा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 11:38 AM2018-04-26T11:38:58+5:302018-04-26T11:40:09+5:30
केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटार योजनेच्या निविदेस आजच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभापती सुवर्णा जाधव यांनी निविदा मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची आज सकाळी साडेदहा वाजता सभा आयोजित केली होती. लोकमतच्या पाठपुराव्यामुळे शहरातील भुयारी गटार योजनेच्या निविदेस मंजुरी मिळाली.
अहमदनगर : केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटार योजनेच्या निविदेस आजच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभापती सुवर्णा जाधव यांनी निविदा मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची आज सकाळी साडेदहा वाजता सभा आयोजित केली होती. लोकमतच्या पाठपुराव्यामुळे शहरातील भुयारी गटार योजनेच्या निविदेस मंजुरी मिळाली.
‘स्थायीमुळे अडली भुयारी गटारीची निविदा’ असे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी सभेची अनेक दिवसांपासून तयार करून ठेवलेली कार्यक्रमपत्रिका अखेर जाहीर केली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी निविदाधारकाची वाढीव दराची निविदा मंजूर करण्यास परवानगी दिल्यानंतरही महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी केवळ आर्थिक गणिते जुळत नसल्याने जाणीवपूर्वक निविदा मंजुरीसाठी सभेत आणली नाही. मात्र या प्रकल्पाचा थेट संबंध सीना नदीच्या प्रदूषणाशी आहे. गटार योजना झाल्यानंतर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सीना नदीचे प्रदूषण कमी होईल़ मात्र या विषयांवर पदाधिकारी गंभीर नसल्याचे ‘लोकमत’ने स्पष्ट करताच पदाधिकारी खडबडून जागे झाले. अनेक दिवसांपासून न जुळलेले गणित जुळले आणि सभेचा कार्यक्रम सभापतींना जाहीर करावा लागला. त्यानुसार आज झालेल्या सभेमध्ये निविदेस मंजुरी देण्यात आली. १३१ कोटी रुपयांच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली. अवघ्या दहा मिनिटांत ही सभा गुंडाळण्यात आली.