शेवगाव येथील श्रीराम मंदिराच्या भूखंडाच्या भाडेकरारासाठी आता निविदा निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:03 AM2019-09-07T11:03:48+5:302019-09-07T11:05:53+5:30
शेवगाव येथील श्रीराम मंदिराचे भूखंड भाडेकराराने देताना आता निविदा काढूनच भाडेकरार केले जावेत, असा आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे जुन्याच भाडेकरुंशी करार करण्याची देवस्थानच्या विश्वस्तांची पद्धत आता मोडीत निघणार आहे.
लोकमत इफेक्ट/
सुधीर लंके
अहमदनगर : शेवगाव येथील श्रीराम मंदिराचे भूखंड भाडेकराराने देताना आता निविदा काढूनच भाडेकरार केले जावेत, असा आदेश धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिला आहे. त्यामुळे जुन्याच भाडेकरुंशी करार करण्याची देवस्थानच्या विश्वस्तांची पद्धत आता मोडीत निघणार आहे.
श्रीराम मंदिराच्या देखभालीसाठी इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरु असल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. या भूखंडाचे तुकडे तीन वर्षाच्या करारावर घेऊन अनेकांनी त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. आपली स्वत:ची मालमत्ता असल्यासारखा या भूखंडांचा वापर सुरु झाला होता. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर या सर्व व्यवहाराची चौकशी सुरु झाली आहे. विश्वस्तांनी ठराविक नागरिकांना हे भूखंड भाडेकरारावर दिले आहेत. तीन वर्षानंतर त्याच भाडेकरुंशी पुन्हा करार केले जात होते. यात देवस्थानचे नुकसान होत होते. काही भाडेकरुंनी तर या जागेत चक्क परमीट रुम थाटले आहेत. सहधर्मादाय आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन यापुढे करार संपल्यानंतर निविदा काढूनच भूखंड भाड्याने द्या, असा आदेश केला आहे. निविदा पद्धतीमुळे अनेक नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल. त्यात देवस्थानला अधिक भाडेही मिळणार आहे. शिवाय तीन वर्षानंतर पुन्हा निविदा निघणार असल्याने भूखंडांवर पक्के बांधकाम करुन ते मालकीहक्काप्रमाणेही वापरता येणार नाहीत. ज्या भाडेकरुंचे करार संपले त्यांना अशा नोटिसा देण्यास देवस्थानने सुरुवात केली आहे. भूखंडांचा ताबा सोडा व पुन्हा भाडेकरार करावयाचा असेल तर निविदा प्रक्रियेत सहभागी व्हा, असे पत्र देवस्थानने काढले आहे.
निविदा काढूनच भाडेकरार
सह धर्मादाय आयुक्तांनी निविदा काढूनच भूखंडाचे भाडेकरार करा, असा आदेश दिला आहे. त्याप्रमाणे अंमलबजावणी करणार असल्याचे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने ‘लोकमत’ला सांगण्यात आले.
‘धर्मादाय’च्या अधिकाºयांबद्दलही तक्रार
नगरच्या धर्मादाय उपआयुक्त कार्यालयातील अधिकाºयांनी या देवस्थानची चौकशी करताना मुद्दामहून अनियमितेकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार सय्यद आयुब यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. या तक्रारीची पुण्याच्या सहआयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे. या चौकशीत आयुब यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. अशीच तक्रार ‘मोहटा’ देवस्थानच्या चौकशी प्रकरणात नामदेव गरड यांनी केली आहे. धर्मादायचे नगरचे अधिकारी जाणीवपूर्वक या चौकशीस विलंब लावत आहेत, अशी त्यांची तक्रार आहे. त्याही तक्रारीची चौकशी सुरु आहे.