मायंबा गडावर लाखो भाविकांनी घेतले मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:05 PM2020-01-25T12:05:46+5:302020-01-25T12:06:54+5:30
श्री क्षेत्र मायंबा येथील यात्रेनिमित्त शुक्रवारी लाखो भाविकांनी मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मच्छिंद्रनाथांच्या जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमला होता.
मढी : श्री क्षेत्र मायंबा येथील यात्रेनिमित्त शुक्रवारी लाखो भाविकांनी मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मच्छिंद्रनाथांच्या जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमला होता.
पौष अमावस्या हा मच्छिंद्रनाथ यात्रेचा मुख्य दिवस असतो. वर्षभरात पौष अमावस्या, गुढीपाडवा समाधी उत्सव, मच्छिंद्रनाथ जन्म उत्सव या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नाशिक, गंगापूर, ठाणे या भागातील भाविक गुरुवारी रात्रीच येथे मुक्कामी आले होते. शुक्रवारी पहाटे देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के यांच्या हस्ते पहाटे नाथांचे संजीवन समाधीची महापूजा, महाभिषेक करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गुरूवारी रात्रीच गर्दी केली होती. नगर, आष्टी, धामणगाव, पाथर्डी व परिसरातील वाड्या, वस्ती, तांडे येथील पायी येणा-या भाविकांचीही संख्या लक्षणीय होती. दुपारी माध्यान्हीचे महाआरतीला प्रचंड गर्दी झाली होती.
राज्य परिवहन मंडळाच्या विविध जिल्ह्यांमधून येणा-या भाविकांना बसेसची संख्या कमी पडल्याने काहींना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. दुपारी
आरतीनंतर सावरगाव ते मच्छिंद्रनाथ गड दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. गो शाळेच्या आवारात वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवतलाव येथून कोठी मिरवणूक वाजत गाजत निघाली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक ग्रामस्थ उपस्थित होते. तुपात तयार केलेल्या रोटांचे भाविकांना वाटप करण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सावरगावचे सरपंच राजेंद्र म्हस्के, विश्वस्त अनिल म्हस्के, उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, साहेबराव म्हस्के, चंद्रकांत लोखंडे, प्रल्हाद म्हस्के यांनी येणा-या भाविकांचे स्वागत केले. सर्व विश्वस्त मंडळ, सावरगाव ग्रामस्थ व कर्मचारी यांनी यात्रा नियोजनासाठी परिश्रम घेतले. शनिवारी धर्मनाथ बीज व कुस्त्यांचा हंगामा होऊन यात्रेची सांगता होईल.