पाणी, रुग्णालयाच्या चर्चेवरून तणाव : संगमनेर पंचायत समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:05 AM2018-11-17T11:05:24+5:302018-11-17T11:05:26+5:30
पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत दुष्काळात पिण्याच्या पाण्यावर प्रभावी उपाययोजनाबाबत चर्चा सुरू होती.
संगमनेर : पंचायत समिती सभागृहात आयोजित बैठकीत दुष्काळात पिण्याच्या पाण्यावर प्रभावी उपाययोजनाबाबत चर्चा सुरू होती. यावेळी सदस्य अशोक सातपुते यांनी वस्तुस्थितीची माहिती न घेता अडथळा आणल्याचा आरोप उपसभापती नवनाथ अरगडे यांनी केला आहे. मात्र, साकूर येथील ग्रामीण रूग्णालयाचा विषय सुरू असताना मला अरगडे यांनी बोलू न दिल्याचा खुलासा सातपुते यांनी केला आहे.
विकासकामात अडथळे नको. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करु, असे आवाहन सभापती निशा कोकणे यांनी केल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होऊन बैठक शांततेत पार पडली. गुरूवारी पंचायत समिती सभागृहात सभापती निशा कोकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसभापती नवनाथ अरगडे, सदस्य अशोक सातपुते, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे व इतर सदस्य उपस्थित होते. बैठकीत साकूर गणाच्या सदस्या संगीता कुदनर या पठार भागातील पाण्याच्या परिस्थितीबाबत बोलत होत्या. यावेळी सदस्य सातपुते यांनी वस्तुस्थितीची पूर्ण माहिती न घेता महिला सदस्याच्या मांडणीत मध्येच अडथळा आणला, अशी माहिती अरगडे यांनी दिली.
याबाबत खुलासा करताना सातपुते म्हणाले, पंचायत समितीच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर साकूर येथील ग्रामीण रूग्णालयाचा विषय सुरू असताना बैठकीस तेथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसून केवळ कर्मचारी हजर होते. त्यांच्याकडून माहिती घेत असताना मला अरगडे यांनी बोलू न दिल्याचे सातपुते म्हणाले. यावरून अरगडे व सातपुते यांच्यातील वादग्रस्त चर्चेमुळे सभागृहातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर या दोघांमध्ये सभापती कोकणे व इतरांनी मध्यस्थी केली. विकासकामात अडथळे नको. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करु, असे आवाहन कोकणे यांनी केल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू होऊन बैठक शांततेत पार पडली.