सावेडीतील चाचणी केंद्र इतरत्र हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:35+5:302021-04-10T04:21:35+5:30
अहमदनगर : येथील प्रोफेसर चौकातील आराेग्य केंद्रात लसीकरण व चाचणी केंद्र एकाच ठिकाणी सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने चाचणी केंद्र ...
अहमदनगर : येथील प्रोफेसर चौकातील आराेग्य केंद्रात लसीकरण व चाचणी केंद्र एकाच ठिकाणी सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने चाचणी केंद्र इतरत्र हलविण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या असून, चाचणी केंद्र इतरत्र हलविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती सभागृहनेते रवींद्र बारस्कर यांनी दिली.
सभागृहनेते बारस्कर यांनी शुक्रवारी प्रोफेसर चौकांतील आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी कोरोनावरील लसीकरण व चाचणी एका आरोग्य केंद्रात सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेथील नागरिकांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. याबाबत बारस्कर यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिले. चाचणी केंद्र इतरत्र सुरू करण्याबाबत बारस्कर यांनी फोनवरून सूचना केल्या. उपायुक्त डांगे यांनी तातडीने दखल घेऊन चाचणी केंद्र इतर ठिकाणी हलविण्याची कार्यवाही केली, असे बारस्कर म्हणाले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहे. गर्दी रोखण्यासाठी नागरिकांवर एकीकडे कारवाई केली जात आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी व कोविड चाचणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. लसीकरण व चाचणी एकाच आरोग्य केंद्रात सुरू असल्याने ही गर्दी होत आहे. याबाबत नागरिकांनीही प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. सभागृह नेते बारस्कर यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर लसीकरण व चाचणी स्वतंत्र ठिकाणी सुरू करण्याबाबत कार्यवाही केली गेली.