“मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणाच 'त्या' शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 01:02 PM2020-03-01T13:02:37+5:302020-03-01T13:03:20+5:30
सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल.
अहमदनगर (लोणी) : महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला असून, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा पोर्टलवर अपलोड करण्यास सुरवात झाली आहे. दुसरीकडे मात्र सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. तर शेतकऱ्याच्या आत्महत्येला ठाकरे सरकारची कर्जमाफीची फसवी घोषणा कारणीभूत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
विखे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या ही महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफी फसवी घोषणाच कारणीभूत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केली आहे.
शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. राज्यातील लोकांच्या चिंता वाढत असताना महाविकास आघाडी सरकारला मात्र सत्ता टिकवण्याची चिंता अधिक आहे. एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, पण या कर्जमाफी योजनेतील कोणतीही स्पष्टता सरकार देऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
तसेच सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार २५ हजार रुपयांची मदत करणार होते. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती. पण एकाही आश्वासनांची पुर्तता या सरकारकडून होत नसल्यामुळेच कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.