अवाजवी वीज दरवाढ रद्द करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करावा, ठाकरे गट आक्रमक
By चंद्रकांत शेळके | Published: April 6, 2023 02:10 PM2023-04-06T14:10:28+5:302023-04-06T14:11:22+5:30
सध्या अनेक भागांमध्ये परस्पररित्या विजेचा खेळखंडोबा होत आहे.
अहमदनगर : महावितरणने सध्या ग्राहकांना केलेली १७ टक्के दरवाढ अन्यायकारक असून ती तातडीने रद्द करावी, तसेच ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी नगरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात कार्यकर्त्यांसह नागरिकांनी ठिय्या दिला. सध्या अनेक भागांमध्ये परस्पररित्या विजेचा खेळखंडोबा होत आहे.
अनेक भागांमध्ये कमी दाबाने वीज मिळत असल्यामुळे उद्योजकांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीमुळे त्या नागरिकांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकलेली नाही. दुसरीकडे नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्या पाणी योजना आहेत, त्या योजनांवर सुद्धा वेळोवेळी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नगर शहराला वर्षातून शंभर दिवसही पाणी मिळू शकत नाही.
विजेची अशी बोंबाबोंब असताना महावितरणने तब्बल १७ टक्के वीज दरवाढ केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. राज्यात एककिडे उन्हाचा पारा वाढत असताना राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपन्यांनी आपल्या वीज दरात भरमसाठ वाढ करून जनतेला ऐन उन्हाळ्यात शॉक दिला आहे. त्यामुळे तातडीने ही दरवाढ रद्द करून ग्राहकांना नियमित वीज पुरवठा करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
याप्रसंगी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता जाधव, योगी गाडे, अमोल येवले, संतोष ग्यानप्पा, संदीप दातरंगे, संजय सायगावकर, डॉ. श्रीकांत चेमटे, अरुण झेंडे, गौरव ढोणे, संतोष धमाल, दीपक भोसले, शरद कोके, पंकज राठोड, नरेश भालेराव, सुनील भोसले, अक्षय नागापुरे, जालिंदर वाघ, महेश शेळके आदि शिवसैनिक उपस्थित होते.