लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन
By अरुण वाघमोडे | Updated: June 5, 2023 16:43 IST2023-06-05T16:42:47+5:302023-06-05T16:43:02+5:30
आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले.

लव्ह जिहाद प्रकरणी अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचे रास्ता रोको आंदोलन
अहमदनगर: कर्जत तालुक्यातील लव जिहाद प्रकरणातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करून त्याच्यावर अपहरण व अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) सोमवारी (दि.५) शहरातील डिएसपी चौकात रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलनादरम्यान वाहतूककोंडी होताच पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. यावेळी आंदोलकांनी पोलीस ठाण्यातही लव जिहाद विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरिश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लव जिहाद प्रकरणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायदा करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, गौरव ढोने, उपशशहरप्रमुख अरुण झेंडे, संजय आव्हाड, प्रशांत पाटील, भगवान कोकने, अशोक पारधे, गिरिधर हांडे, प्रतीक बोडखे, अमोल पडाले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
दरम्यान अपहरणानंतर अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी आरोपीच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आंदोलकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक करून कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची नोंद करून काही वेळानंतर त्यांना सोडून दिले.