"ते मंत्री राज्याचे की, दोन-तीन तालुक्यांचे", बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा
By शेखर पानसरे | Published: December 24, 2022 07:39 PM2022-12-24T19:39:19+5:302022-12-24T19:41:41+5:30
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथीगृहात शनिवारी (दि.२४) संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
संगमनेर : सततच्या विकासकामातून आणि सुसंस्कृत राजकारणातून संगमनेर तालुक्याचा झालेला विकास काहींना पाहवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. ते मंत्री राज्याचे आहेत की, दोन-तीन तालुक्यांचे आहेत. हेच कळत नाही. सत्ता येते आणि जाते. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एका दिवसात सर्व चित्र बदलेल, अशी टीका माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अतिथीगृहात शनिवारी (दि.२४) संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव खेमनर, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सीताराम राऊत, रामहरी कातोरे, संपत डोंगरे, रामदास वाघ, मिलिंद कानवडे, नानासाहेब शिंदे, चंद्रकांत कडलग, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, पद्मा थोरात, संपत गोडगे आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, आपण सर्वांना बरोबर घेत तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम राखली आहे. विकास कामातील सातत्य, सुसंस्कृत राजकारण, समाजकारण, प्रगती यामुळे राज्यात संगमनेर तालुका आदर्शवत ठरला आहे. मात्र, हा संगमनेरचा विकास काहींना पाहवत नसल्याने त्यांचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असून अशा काळात सर्वांनी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी संगमनेर तालुक्याची विकासाची वाटचाल सुरूच राहणार आहे.