संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला; पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद!
By शेखर पानसरे | Published: October 13, 2022 06:55 PM2022-10-13T18:55:30+5:302022-10-13T18:56:00+5:30
संगमनेरातील म्हाळुंगी नदीवरील पूल खचला असून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
संगमनेर : शहराच्या जवळून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून ते संतोषी माता मंदिरापर्यंत असलेला पूल गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास खचला. पूल धोकादायक झाल्याने लगेचच पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. शहरातील रंगार गल्लीपासून पुढे गेल्यानंतर म्हाळुंगी नदीचा पूल ओलांडला असता, साईनगर, संतोषी माता मंदिर, पंपिंग स्टेशन, घोडेकर आणि म्हाळस मळा परिसर आहे. तसेच साई मंदिराशेजारी देवेंद्र अमृतलाल ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्व परिसरांना जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल खचला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुलाच्या पलीकडे राहणाऱ्या नागरिकांना अकोले नाक्याकडून जावे लागणार असल्याने मोठे अंतर वाढले आहे.
ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात शहर, उपनगरे तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. त्यामुळे त्यांनाही महाविद्यालयात जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. म्हाळुंगी नदीला पाणी नसताना साईनगर, घोडेकर आणि म्हाळस मळा परिसरात राहणारे रहिवासी म्हाळुंगी नदीपात्रातून जातात. मात्र, नदीला पाणी असल्याने नदीपात्रातून जाता येणे शक्य नाही. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून संगमनेर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी थांबून आहेत.
पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता
शहराच्या काही भागांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन म्हाळुंगी नदीच्या पुलावरून नेण्यात आली आहे. पूल खचल्याने पाईपलाईनचे देखील नुकसान झाले असून शहराच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम संगमनेर नगर परिषदेकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम तात्काळ सुरू केल्याचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले.