अर्थसंकल्प राहिला बाजूला; कचरा, कुत्रे, ओढे-नाल्यांवरच रंगली चर्चा, नगर महापालिकेतील प्रकार
By अरुण वाघमोडे | Published: March 29, 2023 06:41 PM2023-03-29T18:41:14+5:302023-03-29T18:41:55+5:30
विशेष म्हणजे अनेक बाबतीत महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची अधिकाऱ्यांनीच कबुली दिली.
अरुण वाघमोडे, अहमदनगर: महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेत अर्थसंकल्प राहिला बाजुला आणि कचरा संकलन, मोकाट कुत्रे, ओढे-नाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि पाणीटंचाई आदी समस्यांवरून दणकंदन पेटले. विराेधकांसह सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. विशेष म्हणजे अनेक बाबतीत महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची अधिकाऱ्यांनीच कबुली दिली.
महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२९) महापालिकेत अर्थसंकल्पीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उपमहापौर गणेश भोसले, स्थायीचे सभापती गणेश कवडे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्यासह उपायुक्त, विभाग प्रमुख व नगरसेवक उपस्थित हाेते. सभेच्या प्रारंभी अर्थसंकल्पाच्या तरतुदींवर चर्चा सुरू झाली मात्र, नागरी समस्यांनी वैतागलेल्या नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील विषय मांडण्यास सुरुवात केली.
नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी शहरातील ओढे-नाले गायब झाले आहेत. त्यावरील अतिक्रमण कधी काढणार? असा सवाल उपस्थित केला. आपत्ती व्यवस्थापनाची आयुक्तांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून ओढे-नाल्यांतील अतिक्रमणे हटलेले नाहीत, नाल्यांच्या सफाईसाठी २ कोटींची तरतूद करा, अशी मागणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली. नगरसेवक कुमार वाकळे, शाम नळकांडे, पल्लवी जाधव, विनित पाऊबुधे, रविंद्र बारस्कर, डॉ. सागर बोरुडे यांनी कचरा संकलनावरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरात कचऱ्याचे ढिग साचलेत, प्रभागात नियिमत घंटागाडी येत नाही. नव्याने आलेला ठेकेदार व्यवस्थित काम करत नाही. त्याला दंड का केला नाही. असा सवाल या नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपायुक्त यशवंत डांगे यांनी कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे काम व्यवस्थित नसल्याची कबुली देत त्याच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट केले.
नगरसेवक रविंद्र बारस्कर यांनी मोकाट कुत्र्यांचा विषय उपस्थित करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. या सर्व प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे प्रयत्न केला मात्र नगरसेवकांचे समाधान झाले नाही. वेळेत कामे मार्गी लागत नसल्याने नगरसेवक विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, मनोज कोतकर, बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, बाबासाहेब वाकळे, शीला चव्हाण यांनीही संताप व्यक्त केला.