निळवंडे कालव्यांच्या जलपूजनाला मुख्यमंत्री शिंदे अन् उपमुख्यमंत्री फडणवीस येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 03:42 PM2022-09-01T15:42:57+5:302022-09-01T15:44:00+5:30
सदाशिव लोखंडे : कालव्यांच्या कामासंदर्भात संगमनेरात बैठक
संगमनेर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना खासदार झाल्यानंतर गती दिली. डिसेंबर अखेरपर्यंत कालव्यांची कामे पूर्ण होणार आहेत. त्यावेळी जलपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.
गुरुवारी ( दि.०१) येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासंदर्भात खासदार लोखंडे यांनी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एच. ठाकरे यांच्या दालनात ही बैठक पार पडली. रमेश काळे, रविंद गिरी, दिनेश फटांगरे यांसह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, दत्ता भालेराव, शिवाजी शेळके, जालिंदर कांडेकर, अण्णासाहेब वाघे, कानिफ कणसे, बाळासाहेब घोरपडे, विलास गुळवे, सोपान वाघ, मच्छिंद्र वाघ, रावसाहेब चौधरी, नवनाथ कांडेकर, विजय मगर आदी उपस्थित होते.