‘मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, फडणवीसांनी घेतलं हलक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 06:50 AM2022-03-27T06:50:29+5:302022-03-27T06:51:05+5:30
साई दर्शनासाठी आलेल्या फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : भ्रष्टाचारासंदर्भातील सत्य नाकारता येत नाही व त्यावर उत्तरही देता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी भावनिक भाषणाचा आधार घेतला. मुख्यमंत्री जे बोलले ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आम्ही २०२४ च्या तयारीत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत स्वबळावर आम्ही सरकार स्थापन करू, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
साई दर्शनासाठी आलेल्या फडणवीस यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुराव्यानिशी मांडली. कोविड काळात मुंबई महापालिकेत कशी लूट झाली याची उदाहरणे दिली. त्याचे कोणतेच उत्तर सत्ताधारी पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांकडे नव्हते. त्यामुळे त्यांनी भावनिक भाषणाचा आधार घेतला. भाजपा नेते किरीट सोमय्या स्वत: हातोडा घेऊन निघाल्याप्रकरणी प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, ते प्रातिनिधिक स्वरूपात हातोडा घेऊन निघाले. प्रत्यक्षात कारवाई संबंधित संस्था किंवा न्यायालयच करणार आहे. आमची भूमिका संघर्षाची आहे. आम्ही कुठेही, कुठल्याही कारवाईने दबणार नाही. कुणालाही कुणाच्याही कुटुंबापर्यंत जायचे नाही. कोणतीही एजन्सी कोण कोणाचा नातेवाईक आहे हे बघून कारवाई करीत नाही. तथ्याच्या आधारावरच कारवाई होते, असेही फडणवीस म्हणाले. साई दर्शनानंतर फडणवीस यांचा संस्थानच्या वतीने सीईओ भाग्यश्री बानायत व विश्वस्त जयंत जाधव यांनी सत्कार केला.