Ahmednagar: कामगारांच्या वेतन दरवाढीबाबत आयुक्तांनी मागितला अहवाल
By अरुण वाघमोडे | Updated: June 23, 2023 16:41 IST2023-06-23T16:41:03+5:302023-06-23T16:41:46+5:30
Ahmednagar: नगर येथील रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांच्या मजुरी, वारई दरवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

Ahmednagar: कामगारांच्या वेतन दरवाढीबाबत आयुक्तांनी मागितला अहवाल
- अरुण वाघमोडे
अहमदनगर - नगर येथील रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांच्या मजुरी, वारई दरवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही दरवाढ मिळावी यासाठी कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा देत आहेत. राज्याचे माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काळे यांनी सदर प्रश्न राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांच्यासमोर मांडला होता. या प्रश्नाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी कामगारांच्या वेतन दरवाढीबाबचा अहवाल मागितला आहे.
नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अहमदनगर माथाडी व असंघटित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांना वेतन दरवाढ अंमलबजावणी बाबतचा अहवाल सादर करण्याचे लेखी पत्राद्वारे आदेश कामगार आयुक्तांनी दिले आहेत. मागील महिन्यात काळे यांच्या नेतृत्वाखालील कामगार नेते विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, किशोर ढवळे, सुनील नरसाळे, विजय कार्ले, जयराम आखाडे यांच्या शिष्टमंडळाने याबाबत आयुक्त देशमुख यांची मुंबईतील कामगार भवनात भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर आ.थोरात यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आयुक्तांना सूचना केल्या होत्या.