एक महिन्याच्या कालावधीतच गूड न्यूज कळेल; निलेश लंकेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:50 AM2024-12-02T08:50:28+5:302024-12-02T08:52:27+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बराच फरक आहे. काहीसा गाफीलपणा नडला, असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
NCP Nilesh Lanke ( Marathi News ) : "आपले भविष्य उज्ज्वल आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला विसरणार नाही. भल्या भल्यांना नेस्तनाबूत करण्याची धमक व ताकद आहे. कोणी म्हणत असेल सरकार, आमदार आम्ही आहोत. मात्र, एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्हीही बसू शकतो. एक महिन्याच्या कालावधीतच एक गूड न्यूज कळेल," असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथे महाविकास आघाडीच्या चिंतन मेळाव्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, "एका निवडणुकीने मी खचणारा किंवा हताश होणारा नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव केला त्यांनी या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून माझ्यावर ट्रॅप लावला," असा आरोप लंके यांनी केला. तसंच "आपला काठावरचा पराभव निश्चितच चिंतनाचा विषय आहे. प्रतिष्ठानकडून आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. त्यामुळे येणारा काळ आपला आहे. आम्ही खचत नाही. यापुढील काळात चुकीची दुरुस्ती करण्यासाठी काम करणार आहोत. आरोग्य, नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करुन सुरुवात करणार आहे," अशी माहितीही लंके यांनी यावेळी दिली.
दरम्यान, "आपल्या कामाच्या जीवावर आपण राज्यात ओळख निर्माण केली. आता हताश न होता. आपल्या चुका दुरुस्त करा. समाजाला दोष देऊ नका. पोस्टलला मताधिक्य असेल तर उमेदवार विजय व्हायचा. परंतु, या विधानसभा निवडणुकीत उलटे झाले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बराच फरक आहे. काहीसा गाफीलपणा नडला. परंतु, पारनेरच्या जनतेसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत," असे निलेश लंके यांनी सांगितले.