किती मुडदे पाडायचे, याचा विचार सरकारणे करावा; मनोज जरांगे यांनी घेतली जखमी मराठा बांधवाची भेट
By सचिन धर्मापुरीकर | Published: October 18, 2023 02:27 PM2023-10-18T14:27:44+5:302023-10-18T15:04:38+5:30
सचिन धर्मापुरीकर कोपरगाव (जि. अहमदनगर) : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे ...
सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहमदनगर) : आरक्षणाच्या वेदना घेऊन आलेले मराठा बांधव जखमी झाले आहेत. आरक्षणासाठी यापूर्वी ४५ जणांचे बळी गेलेले आहेत. सरकारला आजून किती बळी घ्यायचे आहेत, किती मुडदे पाडायचेत, याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे. मात्र २४ तारखेनंतर आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी कोपरगाव येथे अचानक भेट दिल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा दिला.
मनोज जरांगे यांच्या येवला (जि. नाशिक) येथील सभेच्या वेळी फुलांची उधळण करताना जेसीबीच्या बकेटमधून पडल्याने दोन मराठा समाज बांधव जखमी झाले होते. पैकी गोकूळ कदम (रा. नेवरगाव, ता. येवला) यांना उपचारार्थ कोपरगाव येथील एसजेएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास जरांगे पाटील कोपरगाव येथे आले होते. रात्रीच्या वेळीही मराठा समाज बांधवांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले, जे जखमी झालेत त्यांच्या वेदना वाया जाऊ द्यायच्या नाहीत. आम्हाला आरक्षण दिल्यास वेदना सहन करण्याची वेळ येणार नाही. मागील ७० वर्षापासूनच्या सरकारचे पाप आम्हाला भोगायची वेळ आली आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. यापुढील आंदोलनाची दिशा २२ रोजी जाहिर करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाविरूद्ध बोलणारांना सोडणार नाही
'त्यांनी' आता बोलायचे सोडले आहे, 'ते' आरक्षणावर बोलले की, आम्हीही सुरू होणार. 'तेच' नाही, कोणीही असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारांना सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भूजबळ यांचे नाव न घेता इतरांनाही दिला.