संगमनेरात मानाच्या पहिल्या गणेश मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
By शेखर पानसरे | Published: September 28, 2023 09:58 AM2023-09-28T09:58:30+5:302023-09-28T09:58:45+5:30
‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या..’
संगमनेर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या..’ असा जयघोष करत पारंपरिक वाद्यांच्या गजरात फुलांची मुक्त उधळण करत संगमनेरातील मानाच्या पहिल्या सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडे आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.
संगमनेरच्या गणेशोत्सवाला १२८ वर्षांची अखंड परंपरा आहे.१८९५-९६ ला रंगारगल्ली येथील सोमेश्वर मंदिरात गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘श्रीं'च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर खऱ्या अर्थाने सार्वजनिक गणेशोत्साची सुरुवात संगमनेरात झाली. शहरातील मानाची १३ गणेशोत्सव मंडळे आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात.
मानाच्या पहिल्या सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाच्या ‘श्रीं’च्या उत्सव मूर्तीच्या महाआरतीवेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, माजी नगरसेवक किशोर पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पासाहेब खरे, राजाभाऊ अवसक आदी यावेळी उपस्थित होते.