बहुचर्चित उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाची काँग्रेसकडून पोलखोल, भ्रष्टाचाराचा केला आरोप

By साहेबराव नरसाळे | Published: June 30, 2023 12:37 PM2023-06-30T12:37:51+5:302023-06-30T12:38:11+5:30

काँग्रेसच्यावतीने या उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली.

The poor work of the popular flyover has been accused of corruption by the Congress | बहुचर्चित उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाची काँग्रेसकडून पोलखोल, भ्रष्टाचाराचा केला आरोप

बहुचर्चित उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाची काँग्रेसकडून पोलखोल, भ्रष्टाचाराचा केला आरोप

अहमदनगर : शहरातील उड्डाणपुलावर पहिल्याच पावसानंतर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून ठेकेदाराने घाईघाईने सुमारे पंचवीसहुन अधिक ठिकाणी रात्रीतून डागडूजी केली आहे. पुलावरील नाल्या तुंबल्या आहेत. पिलरच्या जोड कामाच्या ठिकाणी मोठी फट पडली आहे, असा आरोप करत या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत काळे यांनी गडकरी यांना ईमेलद्वारे निवेदन पाठविले असून यात शहराचे आमदार व खासदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.  

काँग्रेसच्यावतीने या उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली. यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, विद्यार्थी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, आकाश गायकवाड आदी उपस्थित होते. या निकृष्ट कामाचे फोटो काँग्रेसने मंत्री गडकरींना पाठवले आहेत. काळे म्हणाले, १६ - १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अनेक अडथळे पार करत हे काम झाले होते. सुमारे ३.५ किमी लांबी, १९ मीटर रुंदी असणाऱ्या चार पदरी उड्डाणपुलासाठी सुमारे ३३१ कोटी सरकारने खर्च केले आहेत. 

१९ नोव्हेंबरला लाखो रुपयांचा खर्च करत मोठा गाजावाजा करून राजकीय इव्हेंट करत गडकरींच्या हस्ते भाजप, राष्ट्रवादीने लोकार्पण केले. मात्र लोकार्पणानंतर पहिल्याच पावसात अवघ्या सहा महिन्यात निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून ठेकेदाराने घाईघाईने सुमारे २५ हून अधिक ठिकाणी थातूरमातूर डागडुजीचे काम केले आहे. अनेक ठिकाणी सुमारे २० ते ५० मीटर एवढे मोठे पॅचवर्क केले आहे. हे गंभीर व धक्कादायक आहे. नेत्यांनी यात टक्केवारी खाल्ली असून ठेकेदार, अधिकाऱ्यांशी संगनमत करत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं काळे यांनी म्हटले आहे.

खासदार, आमदारांवर टीका
किरण काळे म्हणाले, दक्षिणेचे भाजपचे खासदार व शहराचे राष्ट्रवादीचे आमदार या जोडीने याच पुलावर अनेक वेळा फोटोसेशन केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या पुलाचे काम झाले. या जोडीने नेमके काय दर्जाचे काम करून घेतले आहे याची पोलखोल काँग्रेसने आता नगरकरांसमोर केली आहे. भाजप, राष्ट्रवादीचा हा भ्रष्टाचार असून ही जनहिताचे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची जोडी नसून बंटी - बबलीची जोडी आहे. 

उड्डाणपुलाचे काम सदोष  
काळे यांनी पुलाच्या कामातील अनेक गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. पुलावर आत्तापर्यंत छोटे, मोठे अनेक अपघात झाले आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत. तीन ते चार जणांनी आपले प्राण गमावले आहेत. नाल्या तुंबल्यामुळे पाणी साचले आहे. चांदणी चौकाच्या जवळ असणारे वळण हा मृत्यूचा पॉईंट झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या पिलरचा जोड निखळला असून तो तातडीने दुरुस्त न केल्यास नजीकच्या काळात मुंबईत यापूर्वी घडलेल्या दुर्घटनेप्रमाणे पूल कोसळण्याची दाट शक्यता आहे, असा दावा काळे यांनी केला आहे.

Web Title: The poor work of the popular flyover has been accused of corruption by the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.