बोअरवेलमधून हवेत उडाला पंप, शंभर फूट उंच आकाशात उसळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:41 AM2023-11-30T10:41:41+5:302023-11-30T10:42:20+5:30
Ahmednagar : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साईधाम या ठिकाणी नवीन बोअरवेल घेताना तेथून जवळ असलेल्या जुन्या तीनशे फूट बोअरवेलमधून हवेच्या दाबाने पाण्यासह पंप व पाइप शंभर फूट उंच उडाल्याची आश्चर्यकारक घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
बोधेगाव (जि. अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील साईधाम या ठिकाणी नवीन बोअरवेल घेताना तेथून जवळ असलेल्या जुन्या तीनशे फूट बोअरवेलमधून हवेच्या दाबाने पाण्यासह पंप व पाइप शंभर फूट उंच उडाल्याची आश्चर्यकारक घटना रविवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातून सर्वत्र व्हायरल होत आहे. असा अद्भुत प्रकार पहिल्यांदाच घडल्याने परिसरात याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
२५ वर्षांत पहिल्यांदाच आला अनुभव...
nबोअरवेल व्यवसायात जवळपास २५ वर्षांपासून काम करत आहे. परंतु २५ वर्षांत पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचा अनुभव पाहायला मिळाला. जमिनीत साधारण १९० फुटांवर असलेल्या पोकळीत क्राॅम्प्रेसरची भरली गेलेली हवा, जमिनीतल्या दोन बोअरवेलमधील पाण्याच्या एकाच सळावर आलेल्या नजीकच्या जुन्या बोअरवेलमधून बाहेर पडली. त्यामुळे सदरील घटना घडली असावी, असे संबंधित बोअरवेल तंत्रज्ञ यांनी सांगितले.
कूपनलिका घेताना हवेच्या दाबाने जवळच्या कूपनलिकांवर परिणाम होऊ शकतो. बोअरवेल मशीनच्या हवेच्या दाबाने भूगर्भात अंतर्गत पाण्याच्या वाहिन्यांतून ही हवा वाहते व जवळच्या कूपनलिकेतून ही हवा बाहेर पडते. त्यातूनच असे प्रकार होतात.
- अजिंक्य काटकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा