येत्या डिसेंबरमध्ये होणार उर्वरित ‘समृद्धी’ खुला; मुख्यमंत्री : दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 07:21 AM2023-05-27T07:21:50+5:302023-05-27T07:21:58+5:30
- प्रमोद आहेर लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी (जि. अहमदनगर) : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला द्रुतगती मार्गाने जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असून येत्या ...
- प्रमोद आहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी (जि. अहमदनगर) : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला द्रुतगती मार्गाने जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असून येत्या डिसेंबरमध्ये उर्वरित समृद्धी मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल़. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीत टर्मिनल इमारतीच्या कामाचे भूमिपूजन जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीत केली़
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील महामार्गावरील शिर्डी इंटरचेंज येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार हेमंत गोडसे, राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समृद्धीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे १३ कृषी प्रकल्प साकार होणार आहेत. समृद्धीसोबत नागपूर ते गोंदिया हा महामार्ग प्रकल्प साकार होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्ग राज्याचा आर्थिक कॉरिडॉर ठरणार आहे. यामुळे १५ जिल्ह्यांचे भाग्य बदलणार आहे. नागपूर ते गोवा, मुंबई ते गोवा या महामागार्मुळे येत्या काळात महाराष्ट्राचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.