रिक्षांचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर, कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी
By चंद्रकांत शेळके | Published: October 13, 2023 07:35 PM2023-10-13T19:35:37+5:302023-10-13T19:35:45+5:30
माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षारॅली काढण्यात आली.
अहमदनगर: महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटना यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, सरकारने मुक्त परवाना धोरण बंद करून नवीन परवाने देणे तात्काळ थांबवावे, १५ वर्षे झालेल्या जुन्या रिक्षा टॅक्सी तात्काळ भंगारात काढाव्यात, अवैध प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रिक्षारॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने रिक्षाचालक सहभागी झाले होते. दरम्यान, रिक्षाचालकांनी बंद पाळल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, मोर्चाला आमदार संग्राम जगताप यांनीही पाठिंबा दिला. यावेळी रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, प्रा. माणिकराव विधाते, कुमार वाकळे, प्रमुख सल्लागार कॉम्रेड बाबा अरगडे, उपाध्यक्ष दत्ता वामन, अशोक औशिकर, नितीन पवार, विलास कराळे, लतीफ शेख, सुधाकर साळवे, गणेश आटोळे, नासिर खान, माऊली जाधव, विजय गव्हाळे आदींसह रिक्षा चालक- मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ. जगताप म्हणाले की, शहरांमध्ये रिक्षा चालक नागरिकांना वाहतुकीची सेवा प्रामाणिकपणे देत असतात. मात्र त्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे ती सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.