जिल्हा परिषद नोकरभरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर
By चंद्रकांत शेळके | Published: October 10, 2023 09:11 PM2023-10-10T21:11:19+5:302023-10-10T21:12:09+5:30
१५ ते २२ ॲाक्टोबर दरम्यान ९ संवर्गांसाठी होणार परीक्षा
चंद्रकांत शेळके, अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ च्या ९३७ पदांसाठी दि. ७ ॲाक्टोबरपासून ॲानलाइन परीक्षा सुरू आहे. दरम्यान, आता दुसऱ्या टप्प्यातील पदांचे वेळापत्रकही कंपनीने जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात ८ संवर्गांसाठी दि. ७ ते ११ अशी परीक्षा होणार आहे. आता दि. १५ ते २२ ॲाक्टोबरदरम्यान ९ संवर्गांसाठी पुढील पाच दिवसा परीक्षा होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३मधील ९३७ पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध होऊन ५ ते २५ ॲागस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले. या सर्व पदांसाठी जिल्ह्यात ४४ हजार ६२६ अर्ज प्राप्त झाले. आता टप्प्याटप्प्याने विविध पदांसाठी परीक्षा होत आहे. पहिल्या टप्प्यात ७ ॲाक्टोबरपासून रिंगमण, वरिष्ठ सहायक लेखा,विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी), लघुलेखक (निम्न श्रेणी व उच्च श्रेणी), तसेच वरिष्ठ सहायक (लेखा) या पदांसाठी परीक्षा होत आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी सहा केंद्रांवर उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली आहे. आयबीपीएस या कंपनीमार्फत ही भरती होत असून, परीक्षेचे नियोजन त्यांनी केले आहे. त्यांच्या मदतीला जिल्हा परिषदेचे वर्ग अ व ब चे अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक असे
दुसऱ्या टप्प्यात १५ ॲाक्टोबरला कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (विद्युत), १७ ॲाक्टोबरला तारतंत्री, फिटर (जोडारी), पशुधन पर्यवेक्षक, १८ ॲाक्टोबरला मुख्य सेविका/पर्यवेक्षिका, दि. २१ व २३ ला कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ग्रामीण पाणीपुरवठा, दि. २२ ला औषध निर्माण अधिकारी असे हे वेळापत्रक आहे.
या संवर्गाचे वेळापत्रक अद्याप नाही
कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक, महिला), आरोग्य सेवक पुरूष (५० टक्के) हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या अंतिम टप्प्यातील संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.