धनगर आरक्षणाबाबतची बोलणी चोंडीतच होतील; उपोषण सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 07:40 AM2023-09-24T07:40:34+5:302023-09-24T07:41:06+5:30
बाळासाहेब दोडतले : उपोषण सुरूच
लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड (जि. अहमदनगर) : धनगर आरक्षणासंदर्भात मुंबई येथील बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. बैठक होऊन तीन दिवस झाले तरी सरकारकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. यापुढे सरकारबरोबर चर्चा अहिल्यादेवींच्या जन्मभूमीत चोंडीतच होईल, अशी माहिती उपोषणकर्ते यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या अठरा दिवसांपासून चोंडी (ता. जामखेड) येथे यशवंत सेना, धनगर समाज बांधवांचे उपोषण सुरू आहे. याबाबत तीन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींच्या उपस्थितीत चर्चा झाली. मात्र त्यामध्ये उपोषणकर्त्यांना अपेक्षित असलेला तोडगा निघाला नाही. त्यामुळे उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले पुन्हा चोंडी येथे येऊन उपोषणात सहभागी झाले. शनिवारी आमदार प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. मात्र उपोषणकर्त्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.