अग्निविरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण अहमदनगरमध्ये सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 09:49 AM2023-01-10T09:49:28+5:302023-01-10T09:50:26+5:30
अग्निवीर योजनेंतर्गत नुकत्याच भरती झालेल्या युवकांना भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.
अहमदनगर : भारतातील अग्नीवीर जवानांच्या पहिल्या बॅचचे सैनिकी प्रशिक्षण अहमदनगर येथील आर्मड कोर सेंटर अँड स्कूलमध्ये (एसीसी अँड एस) सुरु झाले आहे. सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण येथे या जवानांना मिळणार आहे.
अग्निवीर योजनेंतर्गत नुकत्याच भरती झालेल्या युवकांना भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे. या केंद्रातून प्रशिक्षण घेणार्या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालविणारा गनर, तांत्रिक सहायक (टेक्निकल असिस्टंट), रेडिओ ऑपरेटर, मोटार ड्रायव्हर या चार महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.
यासाठी मूलभूत शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण हे केंद्रातील प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. त्यामध्ये १० आठवड्यांचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण आणि २१ आठवड्यांचे अॅडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे.